जेवायला बोलवणाऱ्याचाच घेतला जीव : मानकापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 23:39 IST2020-10-17T23:36:37+5:302020-10-17T23:39:04+5:30
Murder, Mankapur, Crime Newsमानकापुरातील एका गुन्हेगाराने क्षुल्लक वादातून जेवायला बोलविणाऱ्याचा जीव घेतला. शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली.

जेवायला बोलवणाऱ्याचाच घेतला जीव : मानकापुरातील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापुरातील एका गुन्हेगाराने क्षुल्लक वादातून जेवायला बोलविणाऱ्याचा जीव घेतला. शुक्रवारी मध्यरात्री मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभ गायकवाड (वय २२) याला अटक केली.
मृताचे नाव बनारसी (वय अंदाजे ५० वर्षे) आहे. तो गोधनी मार्गावरील श्रीकृष्ण ऑटो गॅरेजच्या बाजूला राहत होता. रोजमजुरी करून पोट भरणारा बनारसी कोण, कुठला ते पोलिसांना अथवा परिसरातील नागरिकांना माहीत नाही. चार वर्षांपूर्वी तो इकडे राहायला आला. दिवसभर कबाडकष्ट करून रात्रीच्या वेळी तो दारू प्यायचा. आरोपी सौरभ गायकवाड हा जुना गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. बनारसीसोबत त्याची ओळख होती. कधी कधी बनारसी आणि आरोपी सोबत दारू प्यायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दारू पिल्यानंतर बनारसीने आरोपी सौरभला जेवायला घरी बोलवले. तो पोहचल्यानंतर ते दोघे गप्पा करीत बसले. क्षुल्लक कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. त्यानंतर सौरभने बनारसीच्या डोक्यावर लाकडी दांड्याने मारले. नंतर दगडाने ठेचले. तो खाली पडल्यानंतर आरोपी पळून गेला. दरम्यान, शुक्रवारी रात्री मैदानात बनारसी जखमी अवस्थेत पडून दिसल्याने एका व्यक्तीने मानकापूर पोलिसांना कळविले. पोलिसांनी तेथे जाऊन बनारसीला मेयोत नेले. तेथील डॉक्टरांनी बनारसीला मृत घोषित केले. त्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
आरोपी पळून जाणार होता
दरम्यान, पोलिसांनी शनिवारी सकाळी चौकशी केली असता बनारसीसोबत शुक्रवारी रात्री सौरभ गायकवाड होता, असे पोलिसांना कळले. त्यामुळे त्याच्या गोधनीतील घरी पोलीस पोहचले. तत्पूर्वीच तो दुसरीकडे सटकला. दिवसभर पोलिसांना त्याने चुकविले. सायंकाळी तो भंडाऱ्याकडे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.