एकाच जमिनीचा अनेकांसोबत सौदा : नागपुरातील मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:42 IST2019-07-31T00:41:34+5:302019-07-31T00:42:26+5:30
गोधनीतील कोट्यवधीच्या जमिनीची एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने पुन्हा पाच ते सात लोकांना विक्री करण्याचा सौदा केला. या वादग्रस्त व्यवहारामुळे वाद निर्माण झाल्यामुळे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे गेले. त्यावरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

एकाच जमिनीचा अनेकांसोबत सौदा : नागपुरातील मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोधनीतील कोट्यवधीच्या जमिनीची एकाने दुसऱ्याला आणि दुसऱ्याने पुन्हा पाच ते सात लोकांना विक्री करण्याचा सौदा केला. या वादग्रस्त व्यवहारामुळे वाद निर्माण झाल्यामुळे प्रकरण मानकापूर पोलिसांकडे गेले. त्यावरून पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
राधाबाई महादेवराव सरोदे (वय ७५, रा. गोधनी), दुर्गाबाई चिरकुट, जयाबाई मधुकर तांडेकर (वय ५०), लीलाबाई नामदेवराव तांडेकर (वय ३६), बेबीताई वासुदेव बर्वे (वय ५५), गीता घनश्याम बर्वे (वय २६) आणि मधुकर तिजारे (वय ४९), अशी आरोपींची नावे आहेत.
उपरोक्त आरोपींनी मधुकर तिजारे यांच्याशी गोधनीतील खसरा नंबर १४४ च्या जमिनीचा खरेदी-विक्रीचा सौदा केला. आरोपी तिजारेने २००९ ला दिलेल्या आममुख्तारपत्राचा गैरवापर करून या जमिनीचा सौदा आधी देवराम गणपतराव उमरेडकरसोबत आणि नंतर दिलीप भाऊराव मेटेसोबत लाखो रुपयात केला. २०१० मध्ये याच जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार तिजारेने भीमरावजी पाथरे यांच्यासोबत करून त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. नंतर ही जमीन यापूर्वीच अनेकांना विकली गेल्याची माहिती मिळाल्याने पाथरे यांनी आरोपी तिजारेला आपली रक्कम परत मागितली. तिजारेने पाथरेंना चेक दिला, मात्र तो बाऊन्स झाला. हा सर्व घोळ सुरू असताना या सौद्यात पुन्हा चार जणांनी उड्या घेतल्या. त्यांनी जमिनीच्या मूळ मालकांकडून ८ जानेवारी २०१५ ला जमिनीचे खरेदीखत लिहून घेतले. त्यामुळे जमिनीचा सौदा अधिकच वादग्रस्त बनला. कोट्यवधींच्या जमिनीचा तिढा सुटत नसल्याचे बघून काही दलालांनीही आपली पोळी शेकून घेण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर भीमरावजी पाथरे यांचा मुलगा सचिन पाथरे (वय ३३) यांनी मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. मानकापूर पोलिसांनी यासंबंधाने चौकशी केल्यानंतर सोमवारी या प्रकरणात उपरोक्त आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
मुख्य आरोपी तिजारेच
या फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी तिजारेच असल्याचे पोलीस सांगतात. त्यानेच कोट्यवधींच्या या जमिनीचा सौदा अनेकांसोबत करून आपले खिसे भरले अन् प्रकरण वादग्रस्त झाल्यानंतर त्याने यात काही दलालांमार्फत संबंधितांवर दडपणही आणण्याचा प्रयत्न केला.