इमामवाड्यात एकाची हत्या
By Admin | Updated: October 14, 2015 03:31 IST2015-10-14T03:31:47+5:302015-10-14T03:31:47+5:30
क्षुल्लक कारणावरून गुंडाच्या एका टोळीने रविवारी रात्री रामबागमध्ये अक्षरश: हैदोस घातला. ..

इमामवाड्यात एकाची हत्या
नागपूर : क्षुल्लक कारणावरून गुंडाच्या एका टोळीने रविवारी रात्री रामबागमध्ये अक्षरश: हैदोस घातला. एका व्यक्तीची हत्या केली. तर, त्याच्या मुलाला गंभीर जखमी केले. यामुळे रविवारी मध्यरात्री रामबाग- इमामवाडा परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती.
बादल राजू गजभिये ( वय २५) याचे घर रामबागमधील मैत्री बौद्ध विहाराजवळ आहे. याच भागात मन्या ऊर्फ मनोज अलोणे, गोलू ऊर्फ आकाश मोरे, मनोज ऊर्फ लेफटी सहारे हेसुद्धा राहतात. आरोपी मन्याच्या मुलीला रविवारी दुपारी बादलच्या दुचाकीचा कट लागला. त्यावरून मन्या आणि बादलमध्ये वाद झाला. तो दिवसभर धुमसत राहिला. शिवीगाळ धमक्यानंतर दोघांनीही हल्ल्याची तयारी केली. रात्री ११.३० ला मन्या, आकाश मोरेने आपल्या आठ ते दहा साथीदारांना गोळा करून बादलच्या घरावर सशस्त्र हल्ला चढवला. बादलनेही प्रत्युत्तर दिल्याने आरोपी मागे सरले. त्यांना हुसकावण्यासाठी पुढे निघालेले बादलचे वडील राजू पंजाबराव गजभिये (वय ४५) हे एकटे जवळ आल्याचे पाहून आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांना ठार मारले. वडिलांच्या मदतीला धावलेल्या बादलवरही तलवारीचे घाव घालून त्यालाही गंभीर जखमी केले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. इमामवाड्याचे एपीआय ए.सी. मोहनकर यांनी आरोपीविरुद्ध हत्या आणि अन्य कलमानुसार गुन्हा नोंदविला. बादलवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहे. (प्रतिनिधी)