नराधम वसंता दुपारेला आता फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दया याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2023 19:57 IST2023-05-04T19:56:36+5:302023-05-04T19:57:10+5:30
Nagpur News २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे.

नराधम वसंता दुपारेला आता फाशीच; राष्ट्रपतींनी फेटाळली दया याचिका
नागपूर : २००८ साली नागपुरातील वाडी परिसरातील अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून ठार मारणारा नराधम वसंता दुपारेला चांगलाच झटका बसला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याची फाशीच्या शिक्षेबाबतची दया याचिका फेटाळली आहे. राष्ट्रपती भवनाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
३ एप्रिल २००८ साली वसंता संपत दुपारे याने त्याच्या शेजारी राहणाऱ्या बालिकेसोबत कुकृत्य करून तिची हत्या केली होती. या प्रकरणात त्याला २०१० साली नागपूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेदेखील ती शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर वसंता दुपारेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयानेदेखील त्याची याचिका फेटाळली होती. तसेच ३ मे २०१७ रोजी पुनर्विलोकन याचिकादेखील फेटाळत त्याच्याविरोधात संताप व्यक्त केला होता. अखेरचा पर्याय म्हणून त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. या प्रकरणात राष्ट्रपती सचिवालयाला २८ मार्च रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अभिप्राय प्राप्त झाला होता. त्याच्या कृत्यातील क्रूरता व त्यामुळे समाजमनावर झालेला आघात पाहता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वसंताची याचिका फेटाळून लावली. त्यामुळे त्याला फाशी होणार हे स्पष्ट झाले असून आता प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या कलमांअंतर्गत सुनावली होती शिक्षा
भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत (अत्याचार) अंतर्गत जन्मठेप, कलम ३६३ (अपहरण) व कलम ३६७ (दुखापत करण्याच्या उद्देशाने अपहरण) अंतर्गत ७ वर्षे सश्रम कारावास व कलम २०१ (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येक कलमांतर्गत वेगवेगळ्या दंडाची शिक्षा सुनावली होती.
डोके ठेचून केली होती हत्या
वसंताच्या वासनेची शिकार ठरलेली ही निरागस मुलगी नागपूरमध्ये वाडी भागात कदगाव-कळमेश्वर मार्गावरील शिवशक्ती नगर येथे कुशाल बनसोड यांच्या चाळीत राहायची. वसंता त्याच्या शेजाऱ्यांचा मित्र होता व तो नेहमी त्यांच्याकडे यायचा. ३ एप्रिल २००८ रोजी वसंता आला तेव्हा ही मुलगी घराबाहेर खेळत होती. वसंताने तिला नागपूरच्या चॉकलेट घेऊन देण्याचे आमिष दाखवून सायकलवर नेले व एका गोदामाजवळच्या झुडुपांमध्ये तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्याने प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून दगडांनी तिचे डोके ठेचत खून केला. या प्रकरणामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील नेला होता.