तात्या टोपेनगरात वृद्धेचा खून

By Admin | Updated: October 8, 2015 02:44 IST2015-10-08T02:44:09+5:302015-10-08T02:44:09+5:30

एका वृद्ध महिलेचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. ही घटना तात्या टोपेनगर येथे बुधवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

Older blood in Tatya Topeangarh | तात्या टोपेनगरात वृद्धेचा खून

तात्या टोपेनगरात वृद्धेचा खून

सेवानिवृत्त नीरी संचालकांची पत्नी : नागरिक दहशतीत
नागपूर : एका वृद्ध महिलेचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. ही घटना तात्या टोपेनगर येथे बुधवारी सकाळी घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
वसुंधरा ऊर्फ जयश्री बाळ (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती नीरीमध्ये वैज्ञानिक होते. ते संचालक पदावरून सेवानिवृत्त झाले होते. चार वर्षांपूर्वीच त्यांचे निधन झाले. कुटुंबात वसुंधरा यांचा मोठा मुलगा निरंजन आणि लहान मुलगा आदित्य आहेत. निरंजन मुंबईत राहतात तर वसुंधरा या लहान मुलगा आदित्य व त्याची पत्नी नीलिमासोबत राहत होत्या. आदित्यला आद्या नावाची १० महिन्यांची मुलगी आहे. आदित्य आणि नीलिमा हे एका खासगी कंपनीत काम करतात. सकाळी ८.४५ वाजता ते कामावर निघून जातात.
त्यांच्या मुलीला वसुंधरा सांभाळतात. बुधवारी नेहमीप्रमाणे दोघेही सकाळी कामावर निघून गेले. सकाळी १०.१५ वाजता मोलकरीण आशा इंगळे ही काम करण्यासाठी आली. तिने नेहमीप्रमाणे मुख्य दरवाजाकडून आवाज दिला. तिचा आवाज ऐकल्यावर वसुंधरा घराच्या मागचा दरवाजा उघडायच्या. परंतु आवाज देऊही वसुंधरा यांनी बराच वेळ दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मोलकरीण आशाने मुख्य दरवाजाला धक्का दिला. धक्का देताच दरवाजा उघडला. घरात येताच वसुंधरा जमिनीवर पडल्या असल्याचे दिसून आले. त्यांच्या गळ्यातून रक्त वाहत होते. जवळच चिमुकली आद्या बसून रडत होती. हा सर्व प्रकार पाहून आशा घाबरली. ती आद्याला घेऊन शेजारी वसुधा आपटे यांच्याकडे गेली. त्यांना सर्व प्रकार सांगितला. आपटे कुटुंबीय वसुंधरांच्या घरी गेले. त्यांनी बाळ कुटुंबातील नातेवाईक व पोलिसांना सूचना दिली. घटनेची माहिती मिळताच अपर आयुक्त श्रीकांत तरवडे, डीसीपी दीपाली मासीरकर, शैलेश बलकवडे घटनास्थळी दाखल झाले. वृद्ध महिलेचा दुपट्ट्याने गळा आवळलेला होता.
पोलिसांनी श्वानपथकाची मदत घेतली. दरम्यान लोकांचीही गर्दी जमा झाली. तात्या टोपेनगर हा श्रीमंत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. दिवसाढवळ््या घरात घुसून खून झाल्याच्या घटनेने परिसरातील नागरिक घाबरले आहेत.
संशयास्पदरित्या फिरणाऱ्याचे कृत्य?
नागपूर : बाळ कुटुंबीयांचा कॉलनीतील लोकांशी फारसा संपर्क नव्हता. त्यामुळे परिसरातील लोकांनाही त्यांच्या घरात काय घडते काय नाही, याबाबत माहिती नाही. वसुंधरा यांच्या शरीरावर दागिने कायम होते. घरातील वस्तूही जागेवर होत्या. त्यामुळे आरोपी हे चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने आले नसून ते केवळ वसुंधरा यांचा खून करण्यासाठीच आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. ज्या प्रकारे मुलगा व सून घरून निघून गेल्यावर खून करण्यात आला, त्यावरून आरोपी हे जवळचेच असल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. मुलगा व सून गेल्यावर दीड तासानंतर मोलकरीण आली. त्यामुळे तासाभरापूर्वीच खून झाल्याचा संशय आहे. बाळ यांच्या घरासमोर मैदान आहे. मंगळवारी रात्री तिथे एक तरुण संशयास्पदरीत्या फिरताना दिसून आला. नागरिकांनी त्याला विचारपूस केली तेव्हा तो घाबरला आणि निघून गेला. बऱ्याच वेळानंतर तो प्रतापनगर चौकात दिसून आल्याचे काही तरुणांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Older blood in Tatya Topeangarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.