Ohh! The total revenue of Rs Three and Quarter thousand crore to Railway from canceled tickets | अबब ! रद्द तिकिटांमधून रेल्वेला सव्वातीन हजार कोटींचा महसूल
अबब ! रद्द तिकिटांमधून रेल्वेला सव्वातीन हजार कोटींचा महसूल

ठळक मुद्दे६ महिन्यांची आकडेवारी : एकूण तिकीट खरेदीतून १७ हजार कोटींची कमाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेकदा अगोदर आरक्षित केलेली तिकिटे प्रवाशांना रद्द करण्याची वेळ येते व यासाठी रेल्वेकडून ठराविक रक्कम कापली जाते. एप्रिल २०१९ पासून अवघ्या सहा महिन्यात देशभरात साडेतीन कोटींहून अधिक तिकिटे रद्द झाली व त्यातून थोडाथोडका नव्हे तर ३ हजार ४२० कोटींहून अधिकचा महसूल जमा झाला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत भारतीय रेल्वेकडे विचारणा केली होती. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत किती सामान्य व तत्काळ तिकिटे खरेदी करण्यात आली, यातून कितीचा महसूल मिळाला, किती तिकिटे रद्द झाली व त्यातून नेमका किती महसूल मिळाला हे प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ एप्रिल २०१९ ते ३० सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण १५ कोटी ५३ लाख ७७ हजार ५१३ तिकिटे काढण्यात आली. यातील सामान्य तिकिटे १२ कोटी ४५ लाख ५३ हजार ६०९ इतकी होती, तर तत्काळ तिकिटांची संख्या ३ कोटी ८ लाख २३ हजार ९०४ इतकी होती. यातून भारतीय रेल्वेला १७, ४५३ कोटी ६० लाख १ हजार ११५ रुपयांचा महसूल मिळाला. तर या कालावधीत ३ कोटी ५० लाख ४५ हजार ८८० तिकिटे रद्द झाली. यासाठी कापण्यात आलेल्या ठराविक रकमेतून भारतीय रेल्वेला ३,२० कोटी ११ लाख ९७ हजार १६८ रुपयांचा फायदा झाला.

३० महिन्यांत तिकिटांतून ७८ हजार कोटींचा महसूल
दरम्यान, एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१९ या ३० महिन्यांच्या कालावधीत देशभरात एकूण ६८ कोटी ६१ लाख ९९ हजार ५६ तिकिटे ‘बुक’ झाली. यातील १४ कोटी ७० लाख ३८ हजार ६८९ तिकिटे तत्काळ होती. एकूण तिकिटांमधून भारतीय रेल्वेला ७७, ९९८ कोटी ७५ लाख ४१ हजार ५१५ रुपयांचा निधी मिळाला. एकूण ‘बुक’ तिकिटांमधून १५ कोटी ६५ लाख ७१ हजार ५७ तिकिटे रद्द करण्यात आली व यातून रेल्वेला १५,१५६ कोटी २६ लाख ७६ हजार ७६५ रुपयांचा महसूल मिळाला.

Web Title: Ohh! The total revenue of Rs Three and Quarter thousand crore to Railway from canceled tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.