वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
By आनंद डेकाटे | Updated: December 18, 2025 20:15 IST2025-12-18T20:11:54+5:302025-12-18T20:15:04+5:30
Nagpur : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका ग्राहकाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Officer who went to collect electricity bill threatened to be killed; Case registered against accused
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : थकीत वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एका ग्राहकाविरुद्ध जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास दयानंद पार्क परिसरातील 'टी लवर शॉप' समोर घडली.
महावितरणच्या सिव्हिल लाईन उपविभागाचे सहायक अभियंता विनय गोंधुळे हे रुपक उपथडे, मोरेश्वर पटले, सोनाली वाघमारे, अजय कनोजीया, पंकज वरकडे, अजय मोर्य, रोशन रणदिवे, प्रविण नितनवरे, राजकुमारी मरसकुले, दर्शना गुरुमुळे, अपेक्षा बहादुरे, ताराचंद दुबे, या आपल्या पथकासह जरीपटका परिसरात थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत होते. दयानंद पार्क गार्डनजवळ असलेल्या 'टी लवर शॉप'चे मालक रणबीर सिंग इकबाल सिंग यांच्याकडे मागील पाच महिन्यांपासून २२,६०० रुपयांची वीज देयके थकीत होती. महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी दुकानात उपस्थित महिलेला देयक भरण्याची विनंती केली. मात्र, बराच वेळ वाट पाहूनही प्रतिसाद न मिळाल्याने नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला.
वीज पुरवठा खंडित केल्याचा राग धरून आरोपी रणबीर सिंग (वय ३३ वर्ष, रा. दीक्षित नगर) याने घटनास्थळी येऊन महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकारानंतर सहायक अभियंत्यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत तायडे यांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत आरोपी रणबीर सिंग इकबाल सिंग विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शिवीगाळ व धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.