अधिकारीच ठरताहेत झारीतील शुक्राचार्य
By Admin | Updated: October 9, 2015 02:52 IST2015-10-09T02:52:41+5:302015-10-09T02:52:41+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन ...

अधिकारीच ठरताहेत झारीतील शुक्राचार्य
आदर्श ग्राम योजना : आमदारांनी गाव दत्तक घेऊनही नियोजन विभागाकडे नोंद नाही
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपापल्या क्षेत्रातील एक गाव आदर्श ग्राम योजनेंतर्गत दत्तक घेऊन विकासाच्या माध्यमातून गावाचा कायापालट करण्याचा संकल्प घेतला आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन विभागाकडे आतापर्यंत जिल्ह्यातील तीनच आमदारांनी गाव दत्तक घेतल्याची अधिकृत नोंद आहे. त्यामुळे गाव दत्तक घेण्यासंदर्भात लोकप्रतिनिधी उदासीन असल्याचे वरवर दिसून येते. मात्र खरा प्रकार वेगळाच आहे. आमदारांनी गाव दत्तक घेऊनही जिल्हा नियोजन विभागाला त्याची माहिती नाही, परिणामी शासनाकडे त्यांची नोंद नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची ही महत्त्वाकांक्षी संकल्पना राबविण्यास अडथळा निर्माण होत आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर रामटेक विधानसभा मतदार क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी १२ सप्टेंबर रोजी खैरी-बिजेवाडा ग्राम पंचायत अंतर्गत चारगाव हे गाव दत्तक घेतले होते. यानिमित्त चारगाव येथे एक छोटेखानी कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात गावातील नागरिक, सरपंच, ग्राम पंचायतीचे पदाधिकारी, यांच्यासह खंडविकास अधिकारी आणि तहसीलदार सुद्धा उपस्थित होते. हा जाहीर कार्यक्रम होऊन महिना होत आला. परंतु त्याची अधिकृत माहिती अजूनही तालुका स्तरावरील अधिकाऱ्यानी जिल्हा नियोजन विभागाला सादर केलेली नाही. परिणामी त्याबाबत नोंदणी झाली नसल्याने शासनदरबारी तसा अहवाल पोहोचू शकलेला नाही. असाच काहीसा प्रकार इतर मतदार संघातील क्षेत्रासंदर्भातही झाला असल्याचे यातून स्पष्ट होते. तालुका अधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन विभागाला कळविले नाही आणि जिल्हा नियोजन विभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यासंदर्भात माहिती घेण्याची तसदी घेतली नाही. अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या अभावामुळे आदर्श गाव होण्याच्या एका चांगल्या अभियानाला अजून गती येऊ शकली नाही. (प्रतिनिधी)