शरद पवार, सुप्रिया सुळें यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:22 IST2017-11-21T23:14:49+5:302017-11-21T23:22:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

शरद पवार, सुप्रिया सुळें यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्विट
आॅनलाईन लोकमत
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या भाषेत मजकूर लिहिणाऱ्या आरोपीला नंदनवन पोलिसांनी मंगळवारी अटक केली. वालचंद्र गिट्टे असे आरोपीचे नाव असून, तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. तो सुरेंद्रनगरात राहतो.
१५ नोव्हेंबरच्या रात्री ११.३१ ते ११.५० या वेळेत आरोपी वालचंद्र गिट्टे याने आपल्या ट्विटरवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट केले. दुसऱ्या दिवशी ते लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव जगदीश पंचबुद्धे आणि नागपूर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल कामळे यांनी प्रारंभी गुन्हे शाखेत आणि नंतर नंदनवन ठाण्यात धाव घेतली. प्रदीर्घ मंथनानंतर नंदनवन पोलिसांनी १६ नोव्हेंबरच्या रात्री भादंविचे कलम ५०० व ५०९ तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याचे सहकलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. प्रकरण हायप्रोफाईल असल्यामुळे पोलिसांनी यासंबंधाने बरीच गुप्तता पाळत चौकशी चालवली. त्यानंतर आज सकाळी आरोपी वालचंद्र गिट्टे याचा पत्ता शोधून त्याच्या मुसक्या बांधल्या.
विशेष म्हणजे, पोलिसांनी त्याला अटक केल्याचे नंदनवनमधील काही कर्मचारी सायंकाळी सांगत होते तर, रात्री ९ वाजेपर्यंत त्याला अटक झाली नसल्याचे पोलीस ठाण्यातून काही कर्मचारी सांगत होते.