दोषसिद्धीनंतर गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 23:45 IST2021-01-07T23:44:39+5:302021-01-07T23:45:54+5:30
High court Verdict आरोपीला तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपी व फिर्यादी यांनी त्या गुन्ह्यात तडजोड केल्यास, केवळ त्या आधारावर संबंधित गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने दिला.

दोषसिद्धीनंतर गुन्हा रद्द केला जाऊ शकत नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आरोपीला तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर आरोपी व फिर्यादी यांनी त्या गुन्ह्यात तडजोड केल्यास, केवळ त्या आधारावर संबंधित गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठातील पूर्णपीठाने दिला. या पीठात न्या. अतुल चांदुरकर, न्या. विनय जोशी व न्या. नितीन सूर्यवंशी यांचा समावेश होता.
अकोला जिल्ह्यातील माया खंडारे व रूपेश काळे यांच्या प्रकरणामध्ये यासंदर्भात उच्च न्यायालयाचे परस्परविरोधी मते आढळून आल्यामुळे योग्य खुलासा होण्यासाठी पूर्णपीठाची स्थापना करण्यात आली होती. तडजोडयोग्य नसलेल्या गुन्ह्यात झालेली तडजोड मंजूर करण्याचा न्यायालयाला अधिकार नाही. तसेच, अशा तडजोडीच्या आधारावर गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकत नाही असे पूर्णपीठाने सांगितले. याशिवाय त्यांनी वैवाहिक वाद व इतर दुर्मिळातल्या दुर्मिळ प्रकरणात गुन्ह्याची संपूर्ण कारवाई रद्द केली जाऊ शकते असेही स्पष्ट केले. त्याकरिता संबंधित प्रकरणामुळे न्यायालयीन प्रक्रिया निरर्थक ठरेल असे आढळून यायला हवे. तसेच, न्यायाचे रक्षण करण्यासाठी गुन्हा रद्द करणे आवश्यक असल्याची जाणीव व्हायला हवी असे न्यायालयाने नमूद केले.