गोळवलकर गुरुजींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, संघ स्वयंसेवकांकडून पोलिसांत तक्रार
By योगेश पांडे | Updated: March 6, 2025 21:20 IST2025-03-06T21:20:37+5:302025-03-06T21:20:52+5:30
संघ स्वयंसेवकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे.

गोळवलकर गुरुजींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, संघ स्वयंसेवकांकडून पोलिसांत तक्रार
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या सोशल मीडियावरील दोन अकाऊंटधारकांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. महालातील संघ स्वयंसेवकांनी कोतवाली पोलीस ठाण्यात ही तक्रार केली आहे.
‘शेमलेस इरा’ आणि ‘द न्यू इंडिया’ या समाज माध्यमांवरील या दोन अकाउंट विरोधात गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या दोन्ही अकाउंटद्वारे गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकाचा उल्लेख करत त्यात गुरुजींनी संभाजी महाराजांच्या विरोधात लिहिल्याचे खोटा दावा केला जात आहे. त्यासाठी छावा चित्रपटातील काही फोटोंचा वापर केला जात आहे. या दोन्ही अकाउंट द्वारे गेले अनेक दिवस सातत्याने गुरुजींबद्दल आक्षेपार्ह लिखाण केलं जात आहे. सोबतच संभाजी महाराजांबद्दलही चुकीची माहिती पसरविली जात आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक संघ स्वयंसेवकासाठी आराध्य दैवत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या दोन्ही अकाउंट चालवणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी संवेदना परिवार संस्थेचे सचिव सागर कोतवालीवाले यांनी केली आहे.