ओबीसी संघटनेचे शिष्टमंडळ मंत्री, सचिवांना भेटले; विद्यार्थ्याचे वसतीगृह व स्वाधार योजनेवर चर्चा
By निशांत वानखेडे | Updated: July 4, 2023 18:45 IST2023-07-04T18:45:25+5:302023-07-04T18:45:57+5:30
ओबीसी संघटनेचे शिष्टमंडळ ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व उपसचिव दिनेश चव्हाण यांना भेटले.

ओबीसी संघटनेचे शिष्टमंडळ मंत्री, सचिवांना भेटले; विद्यार्थ्याचे वसतीगृह व स्वाधार योजनेवर चर्चा
नागपूर : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत (ओबीसी) इतर मागास प्रवर्ग, भटके विमुक्त आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी ७२ वसतिगृहे व २१,६०० विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना सुरु करण्याच्या मुद्याला घेऊन विदर्भातील ओबीसी संघटनेचे शिष्टमंडळ ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे व उपसचिव दिनेश चव्हाण यांना भेटले.
यावेळी स्टुडटंस राईटस असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कोराम, ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे, ओबीसी युवा अधिकारमंच, ओबीसी सेवा संघाचे अनिल डहाके व ओबीसी कर्मचारी संघटनेचे एस. यु. वंजारी आदी पदाधिकारी सहभागी होते. दहावी,बारावीचे निकाल घोषित होवून जवळपास एक महिना उलटला आहे. इतर अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील इतर मागास, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी यावे लागते. मात्र शहरात वास्तव्याची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना हालाकीचा सामना करावा लागतो. अनेक विद्यार्थी गरिबीमुळे शहरात येवूच शकत नाही. यास्तव ओबीसी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. ग्रामीण इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वसतिगृहे व अनुसूचित जातीच्या धर्तीवर स्वाधार योजना ओबीसी विद्यार्थ्यांना लागू व्हावी तसेच वसतीगृह तातडीने सुरु करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंत्री सावे यांनी वसतीगृह व स्वाधार योजनेवर काम सुरू असून प्रस्ताव मागवण्यात आल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसात यावर बैठक घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.