ओ काका, ओ साहेब ‘मास्क लावा’...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:08 IST2021-06-02T04:08:46+5:302021-06-02T04:08:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : चौकाच्या कडेला बैठक मारून असलेली काही मंडळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या गप्पांचा फड रंगवीत होते. ...

ओ काका, ओ साहेब ‘मास्क लावा’...
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : चौकाच्या कडेला बैठक मारून असलेली काही मंडळी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या गप्पांचा फड रंगवीत होते. काहींचा मास्क हनवटीवर तर काहींचे बैठकीचे अंतरही जेमतेम आणि काहींनी तर मास्कही घातला नव्हता. अशातच काही शाळकरी मुले पोहोचलीत. ‘ओ काका, ओ साहेब मास्क लावा...अंतर ठेवा, गर्दी करू नका’ अशा बालीश आणि हक्काच्या सूचना त्यांनी दिल्या. लागलीच हनवटीवर असलेले मास्क तोंडावर चढले. काहींनी अंतर पाळले आणि काहींनी खिशातील मास्क तोंडाला लावला.
दुचाकी वाहनचालक असो, पायी जाणारे नागरिक असोत प्रत्येकाला काळजी घेण्याबाबतही संपूर्ण चमू बेधडकपणे व्यक्त होत होती. उमरेड शहरातील या अभिनव-अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा दिसून आली. प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांच्याशी चर्चा केली असता, आम्ही जीवन विकास विद्यालय, अशोक विद्यालय तसेच जीवन विकास वनिता विद्यालयाचे इयत्ता दहावीचे विद्यार्थी आहोत, अशी माहिती त्यांच्याकडून मिळाली. सध्या शाळा नाही. परीक्षा सुद्धा रद्द झाली. अशावेळी करणार काय, तर आपण सारे ही मोहीम राबवूया असा निर्णय या मित्रांनी घेतला. आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांच्या या मोहिमेचे सर्वांनीच कौतुक केले. या मोहिमेत प्रणय बलवंत, गौरव चांदेकर, इशांत हेडावू, हितेश अमृ, मयूर लेंडे, अभी बोकडे, धनश्री कुहीकर, दिव्या झाडे, तनश्री झाडे यांचा सक्रिय सहभाग होता.
.....
शासनाने दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला. याचा अर्थ पूर्णत: मोकळीक दिली असा होत नाही. तेव्हा नागरिक नियमावलीकडे दुर्लक्ष करतात. विनाकारण फिरतात. गर्दी करतात. अशावेळी या शाळकरी विद्यार्थ्यांचा उपक्रम हटके आहे. लहान मुलांना समजते. मोठ्यांनाही अक्कल आली पाहिजे.
- प्रमोद कदम, अध्यक्ष, तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती, उमरेड