बदली सत्रात रुजू होणाऱ्यांची संख्या कमी
By Admin | Updated: January 15, 2015 00:53 IST2015-01-15T00:53:47+5:302015-01-15T00:53:47+5:30
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रांमुळे अधिकारी कमालीचे धास्तावले आहेत. केंव्हा,कधी, बदल्यांचे आदेश येईल याचा काहीही अंदाज नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

बदली सत्रात रुजू होणाऱ्यांची संख्या कमी
नागपूर महसूल विभाग : १२ पैकी ५ रुजू
नागपूर : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या बदल्यांच्या सत्रांमुळे अधिकारी कमालीचे धास्तावले आहेत. केंव्हा,कधी, बदल्यांचे आदेश येईल याचा काहीही अंदाज नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे अनेक अधिकारी अद्याप रुजू झाले नाहीत. विभागात अशा अधिकाऱ्यांची संख्या ७ आहे.
नवीन सरकारने स्थिर स्थावर झाल्यानंतर बदल्यांच्या सत्राला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात ४२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मंगळवारी पुन्हा १७ जणांच्या बदल्या झाल्या. यात नागपूरसह विदर्भातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा समावेश आहे. तत्पूर्वी उपजिल्हाधिकारी व समकक्ष पदावरील अधिकाऱ्यांनाही हलविण्यात आले होते. सर्वसामान्यपणे मार्चमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. यंदा डिसेंबरपासूनच त्याला सुरुवात झाली. बदल्या ही प्रशासकीय प्रक्रिया असली तरी मधल्या वेळेत बदल्या झाल्याने मुलांच्या शाळा आणि इतरही कारणांमुळे अधिकाऱ्यांपुढे अडचणी येतात. त्यामुळे ते एक तर रुजू होत नाही आणि झाले तरी ते रजा घेतात. असाच काहीसा प्रकार नागपूर विभागातही पाहायला मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर विभागात १२ महसूल अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यापैकी फक्त ५ अधिकारी रु जू झाले. त्यातील तिघांनी रजा टाकली आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त आयुक्त हे पद वगळता इतर उपायुक्तांच्या जागा भरण्यात आल्या आहेत. अतिरिक्त आयुक्त हे महत्त्वाचे पद गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहे. या पदावर आता पूर्ण वेळ अधिकारी येईल, असा अंदाज होता. पण पुन्हा या पदाचा अतिरिक्त कार्यभार वनामतीचे संचालक एम. संकरनारायणन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तत्पूर्वी अलीकडेच उपायुक्त म्हणून रुजू झालेल्या हेमंत पवार यांच्याकडे त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. (प्रतिनिधी)