एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 08:36 PM2020-02-15T20:36:33+5:302020-02-15T20:38:48+5:30

संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत.

NPR's hidden agenda for implementing NRC: Javed Pasha | एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

एनपीआर हा एनआरसी लागू करण्याचा छुपा अजेंडा  : जावेद पाशा

Next
ठळक मुद्देएनआरसी म्हणजे मनुवादी व्यवस्था आणणारी प्रतिक्रांतीच

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : संविधानाच्या मूल्यातून आलेल्या लोकशाहीत विषमतेचे मूळ असलेली मनुवादी व्यवस्था आणता येत नाही हे लक्षात आल्याने मनुवादी विचारधारेचे वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न सुरू आहेत. नॅशनल रजिस्टर  ऑफ  सिटिझन  (एनआरसी) हा त्याचाच भाग आहे. मात्र संविधानामुळे एनआरसी लागू करण्यास अडचण येत असल्याने नॅशनल पापुलेशन रजिस्टर (एनपीआर) च्या माध्यमातून ती लागू करण्यात येत आहे. एनपीआर हा एनआरसी आणण्याचा छुपा अजेंडाच आहे, अशी परखड टीका ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. जावेद पाशा यांनी केली.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सावित्री-फातिमा संस्कृती संगीतीमध्ये ते बोलत होते. कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे आयोजित कार्यक्रमात विद्रोही चळवळीचे धनाजी गुरव, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जगजित सिंह, प्रसेनजित गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात बोलतांना प्रा. पाशा म्हणाले, विषमतेने बरबटलेल्या समाज व्यवस्थेला समतेच्या मार्गावर आणण्यासाठी तथागत बुद्ध, महावीर, चक्रधर, बसव अण्णा, गुरुनानक, येशू, पैगंबर, कबीर, महात्मा फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वेगवेगळ्या काळात क्रांती केली आहे. मात्र या क्रांतीला मोडून सत्ता वर्चस्वासाठी मनुवाद्यांची प्रतिक्रांती सातत्याने सुरू आहे. एनआरसी आणि सीएए हा सुद्धा प्रतिक्रांतीचाच भाग होय, जो संविधान मानण्यास इन्कार करणाऱ्या संघाच्या थिंक टॅँकने आधीच ठरवून दिला आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत बहुजनांचा सहभाग वाढविल्याने द्वेषाने महात्मा गांधी यांची हत्या करणारी हीच विचारधारा होय. मुस्लिमांना लक्ष्य करून आसाममध्ये एनआरसी लागू केल्यानंतर १४ लाखाहून अधिक बहुजन, आदिवासी व हिंदूनाच त्याचा फटका बसल्याने यांचे षड्यंत्र उघडे पडले. त्यामुळे देशात लागू करण्यात अडचणी लक्षात घेता वेगळा मार्ग निवडण्यात आला. धनाजी गुरव म्हणाले, विषमतापूर्ण व्यवस्थेसाठी प्रतिक्रांती करणे हा त्यांचा ठरलेला अजेंडा आहे. मात्र फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचे अनुयायी, गांधींचे अनुयायी आणि पुरोगामी चळवळी चालविणाºयांनी काय केले, याचा विचार करावा. मनुवाद्यांनी वेगवेगळ्या समाजाच्या दैवतांना हिंदुत्वाच्या बुरख्याखाली एकत्रित करून सत्ता वर्चस्व कायम करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. आम्ही मात्र बुद्ध, महावीर, लिंगायत आणि गुरुनानकांच्या समतावादी विचारधारांना एका सूत्रात बांधू शकलो नाही. भारतीय संविधानात या सर्व विचारवंतांचे सार आहे, तरीही या समाजातील लोक संविधान मोडणाºयांच्या दावणीला बांधले जात असल्याचे परखड मत त्यांनी मांडले.प्रास्ताविक प्रसेनजित गायकवाड यांनी केले. संचालन माधुरी सेलोकर यांनी केले.

 मोदी, शहांचे आभार
 समता आणि सर्वांना समान अधिकारासाठी महान कार्य करणाºया महात्मा गांधी व डॉ. आंबेडकरांना समजून घेण्याचा प्रयत्न बहुजन समाज व मुस्लिमांनी कधी केला नाही. मात्र सीएए, एनआरसी आणण्याच्या घोषणेनंतर या महान नेत्यांशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. यासाठी मोदी आणि शहा यांचे आभार मानावेच लागतील, अशी उपरोधिक टीका प्रा. पाशा यांनी केली.

Web Title: NPR's hidden agenda for implementing NRC: Javed Pasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.