आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

By योगेश पांडे | Updated: January 23, 2025 20:53 IST2025-01-23T20:53:14+5:302025-01-23T20:53:46+5:30

प्रस्ताव तयार करण्याची सूचना

Now two additional collector offices in big districts; Revenue Minister Bawankule's instructions | आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

आता मोठ्या जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये; महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महसूल प्रशासनाचे कामकाज आणखी गतीने व्हावी यासाठी राज्यातील सर्व मोठया जिल्ह्यांत दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावले उचलली असून तातडीने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी राज्यातील सर्व विभागीय महसूल आयुक्तांना दिल्या आहेत.

मागच्या आठवड्यात पुणे येथील विभागीय आयुक्तालयात महसूल मंत्र्यांनी पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारीपदाची गरज असल्याचे सांगितले. मोठया जिल्ह्यांचे आकारमान, कामकाज, गरज, महसूल व कार्यपद्धती लक्षात ही पदे तातडीने निर्माण करण्याची सूचना त्यांनी केली होती. गुरुवारी बावनकुळे यांनी नागपूर येथील एका बैठकीनंतर सर्व विभागीय आयुक्तांना दूरध्वनीवर संपर्क साधून या पदांचे प्रस्ताव तातडीने तयार करावेत अशी सूचना केली.

शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तोपर्यंत शासकीय योजनांनाही अर्थ उरणार नाही. उपेक्षित घटकांना न्याय देण्यासाठी महसूल यंत्रणा, आदिवासी विभाग, सामाजिक न्याय विभाग यांनी जबाबदारीने अशा वस्त्यांना भेटी देऊन त्यांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले.

महसूल विभागाशी संबंधित प्रकरणांचा तत्काळ निपटारा व्हावा, सुनावणीसाठी जी प्रकरणे आहेत त्यावर योग्य कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये दोन अपर जिल्हाधिकारी कार्यालये संपूर्ण आस्थापनेसह कार्यान्वित करण्याबाबात प्रस्ताव सादर करा, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली.

Web Title: Now two additional collector offices in big districts; Revenue Minister Bawankule's instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.