Now the threat of Crimean Congo from animals to humans | आता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका

आता जनावरांपासून माणसांना क्रायमिन काँगोचा धोका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लम्पी स्किन डिसीजनंतर आता महाराष्ट्रातील जनावरांना क्रायमिन काँगोचा धोका वाढला आहे. गुजरातमधील जनावरांना या आजाराची लागण झाली असून हा जनावरांपासून माणसांना होणारा हा आजार महाराष्ट्रात येऊ नये यासाठी नाक्यांवर तपासणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांसह सर्वच ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्तालयाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

जनावरांपासून थेट माणसांना होणारा हा आजार आहे. पशुसंवर्धन विभागाने जारी केलेल्या पत्रामध्ये या आजारामुळे ९ ते ३० टक्के व्यक्तींच्या मृत्यूचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे ही बाब गंभीर मानली जात आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिका, चीन, हंगेरी, कांगो, इराण, बल्गेरिया आदी देशांमध्ये जनावरांपासून माणसांना झालेला हा आजार आढळला होता. अद्याप महाराष्ट्रात या आजाराचा शिरकाव झालेला नसला तरी खबरदारीच्या सर्वतोपरी सूचना पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांना आणि पशुवैद्यकांना दिल्या आहेत.
हा आजार झुनोटिक स्वरूपाचा असून नैरो व्हायरस विषाणूपासून पसरतो. हायलोमा जातीच्या गोचिडापासून जनावरे संक्रमित होतात. या जनावरांचा चावा घेतलेले गोचीड, डास तसेच पिसवा माणसांना चावल्यास माणसे संक्रमित होतात. नागरिकांनी कच्चे मांस, कच्चे दूध खाणे टाळावे. तसेच गोठे स्वच्छ करून गोचीड व कीटकांचे निर्मूलन करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. गुजरातच्या सीमेवरील नाशिक, नंदुरबार, धुळे, पालघर या जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. आंतरराज्य तपासणी नाक्यांवर जनावरांची तपासणी केली जात आहे.

ही आहेत लक्षणे
हा आजार झालेल्या रुग्णाला तीव्र डोकेदुखी होते. जास्त प्रमाणात ताप येतो. सांधेदुखी, पोटदुखी आणि उलटी होणे अशी लक्षणे दिसतात. आजारी व्यक्तीचे डोळे लाल होतात. घशामध्ये आणि तोंडामध्ये लाल ठिपके पडतात. आजार बळावल्यास त्वचेखाली व नाकातून रक्तस्राव होतो. लघवीवाटेदेखील रक्तस्राव होतो. काही व्यक्तींमध्ये काविळासारखी लक्षणेदेखील आढळतात.

सुरक्षिततेसाठी उपाय
या आजारावर अद्याप कसलीही लस उपलब्ध नाही. आजार पसरू नये यासाठी जंतूचे वाहक असलेले गोचीड, पिसवा, डास यांचे निर्मूलन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन आयुक्तालयाने दिल्या आहेत. गोठ्याची नियमित फवारणी, गोचीड, डास आणि पिसवांचे निर्मूलन करणे, ते चावणार नाही याची दक्षता घेणे, तसेच जनावरांच्या अंगावरील गोचीड हाताने न फोडणे अशा सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अशी घ्यावी काळजी
गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या या प्रकारच्या प्राण्यांच्या माध्यमातून माणसांना होणारा हा आजार आहे. या जनावरांच्या थेट संपर्कात येणाऱ्यांनी काळजी घ्यावी. कत्तलखान्यात काम करणाऱ्यांनी तसेच जनावरांच्या डॉक्टरांनीदेखील रक्ताच्या माध्यमातून जंतुसंसर्ग होणार नाही याची दक्षता घ्यावी. लसीकरणासाठी वापरलेल्या सुया, सिरीज, हॅण्डग्लोव्हज नष्ट करावे.

गुजरातमध्ये आजाराची २०११ मध्ये नोंद
२०११ मध्ये गुजरात राज्यात मनुष्यात या आजाराची प्रथम नोंद झालीे. या आजाराने तिथे तीन मृत्यू झाले होते. त्यानंतरही तुरळक स्वरुपात गुजरात व राजस्थानमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र, उद्रेक कुठेच झाल्याची नोंद नाही. देशात प्रामुख्याने गुजरातमध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी केली असता अर्धा टक्के नागरिकांमध्ये अ‍ॅन्टिबॉडीज आढळल्याची नोंद आहे.

डॉ. अनिल भिकाने, सहयोगी प्राध्यापक, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पदव्युत्तर संस्था, अकोला

जनावरांपासून माणसांना संक्रमित होणारा हा आजार आहे. महाराष्ट्रात अद्याप एकही रुग्णांची नोंद नाही, परंतु खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजरातच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये अतिदक्षता घेतली जात असून आंतरराज्यीय नाक्यांवर तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.
- धनंजय परकाळे, पशुसंवर्धन अतिरिक्त आयुक्त, पुणे
 

 

Web Title: Now the threat of Crimean Congo from animals to humans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.