आता माघार नाहीच!
By Admin | Updated: October 15, 2016 03:28 IST2016-10-15T03:28:41+5:302016-10-15T03:28:41+5:30
नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन

आता माघार नाहीच!
मदन कुलकर्णी : उपेक्षित साहित्य प्रवाहांना संमेलनाच्या मंचावर आणण्याचा संकल्प
नागपूर : नागपूर-विदर्भातूनच दोन ज्येष्ठ समीक्षकांनी परस्परांविरुद्ध निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन होऊन त्याचा लाभ तिसराच उमेदवार घेईल. ते टाळण्यासाठी कुणीतरी एकाने माघार घ्यावी, असे कुणाला वाटत असेल तर ते अतिशय स्वाभाविक आहे. याच भावनेतून मलाही दोन फोन आलेत. परंतु माझा निर्धार पक्का आहे. माघार घेण्याचा प्रश्नच नाही, अशा ठाम शब्दात ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. मदन कुलकर्णी यांनी आपली भूमिका मांडली. शुक्रवारी ते विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
संमेलनाध्यक्षाचे विचार गांभीर्याने समाजापर्यंत पोहोचतात म्हणून मी ही निडणूक लढवित आहे. माझा अजेंडा खूपच स्पष्ट आहे. ग्रामीण, दलित व आदिवासी साहित्यामध्ये अनेक जण अतिशय ताकदीने लिहित आहेत. परंतु त्यांना अजूनही मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संधी मिळत नाही. ती मिळावी असा माझा प्रयत्न आहे. याशिवाय दिव्यांगांच्या क्षेत्रातही कसदार साहित्य निर्मिती होत आहे. परंतु तिकडेही साहित्य विश्वाचे लक्ष नाही. या सर्व उपेक्षित घटकांसोबतच मुख्य प्रवाहातील साहित्याला एक नवा विचार देता यावा हा माझा प्रयत्न आहे. हे संमेलन साधेपणाने व्हावे, या महामंडळाच्या भूमिकेचे मी समर्थन करतो. संमेलनाचा अध्यक्ष कुणीही होवो. त्याने महामंडळाकडून मिळणारा एक लाखाचा निधी भारतीय लष्कराच्या कल्याणार्थ द्यायला हवा आणि वर्षभर जी साहित्यविषयक भ्रमंती करायची आहे ती स्वखर्चाने करायला हवी, असे मला वाटते, असेही डॉ. कुलकर्णी म्हणाले. (प्रतिनिधी)
...म्हणून लिफाफा बंद होता
मी विदर्भ साहित्य संघाकडे जो लिफाफा सोपवला त्यात माझा उमेदवारी अर्जच होता. परंतु माझी उमेदवारी वैध ठरेपर्यंत माझे सूचक व अनुमोदक यांची नावे समोर यायला नको, असे मला वाटत होते. कारण, ती नावे समोर आली असती तर माध्यमांचे फोन त्यांना सुरू झाले असते. निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी उमेदवारी वैध असल्याचे जाहीर करेपर्यंत असा त्रास कुणाला होऊ नये, केवळ इतकाच हेतू होता. म्हणूनच मी बंद लिफाफा दिला व तो १० आॅक्टोबरपर्यंत उघडू नये, अशी सूचनाही विदर्भ साहित्य संघाला केली होती, असा खुलासाही यावेळी डॉ. मदन कुलकर्णी यांनी केला.