कोरोनाबाधितांचे आता टेलिसमुपदेशन; मनपा-आयएमएचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 13:27 IST2020-09-19T13:26:44+5:302020-09-19T13:27:01+5:30
नागपूर महापालिका व इंडियन मेडिकल असोसिएशचे (आयएमए) १०० वर नामांकित डॉक्टर कोरोना रुग्णांचे टेलिसमुपदेशन करणार आहेत.

कोरोनाबाधितांचे आता टेलिसमुपदेशन; मनपा-आयएमएचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : होम आयसोेलेशनमध्ये असलेल्या कोरोनाबाधितांना त्यांच्यावरील उपचार व प्रकृ ती विषयी अनेक प्रश्न असतात. अशा रुग्णांच्या मदतीसाठी महापालिका व इंडियन मेडिकल असोसिएशने (आयएमए) पुढाकार घेतला आहे. शहरातील १०० वर नामांकित डॉक्टर अशा रुग्णांचे टेलिसमुपदेशन करणार आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या ८० ते ८५ टक्के रुग्णांना लक्षणे दिसून येत नाही. या व सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी होम आयसोलेशनचा पर्याय उपलब्ध आहे. सध्या जिल्ह्यात पाच हजारांवर कोरोनाबाधित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. विशेष म्हणजे, नागपूर महानगरपालिका आणि आयएमएने या रुग्णांमधील ५० वर्षांवरील ‘कोरोना हाय रिस्क पॉझिटिव्ह’ रुग्णांची यादी तयार के ली आहे. प्रत्येक डॉक्टर दररोज दहा रुग्णांशी संपर्क साधणार आहे, आणि त्यांचे टेलिसमुपदेशन करणार आहे. हे पूर्णपणे नि:शुल्क असणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी केले आहे. समुपदेशन करणारे डॉक्टर रुग्ण कोरोनामुक्त होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करणार आहेत, अशी, माहिती अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी दिली.
व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातूनही संवाद
होम आयसोलेनशमध्ये असलेल्या रुग्णांसोबत भविष्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनही संवाद साधण्यात येईल. यामुळे डॉक्टरांना रुग्णाची प्रकृती समजून घेऊन प्रभावी उपचार करण्यास मदत होईल,अशी माहिती कुकरेजा यांनी दिली.