आता विद्यार्थ्यांचीही ‘हायटेक’ हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:38 IST2017-10-12T01:38:06+5:302017-10-12T01:38:19+5:30
अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते.

आता विद्यार्थ्यांचीही ‘हायटेक’ हजेरी
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी व बारावीच्या वर्गांत विद्यार्थ्यांची हजेरी नावापुरतीच असल्याचे दिसून येते. नियमांना धाब्यावर बसवून पारंपरिक हजेरी पुस्तकात विद्यार्थ्यांची उपस्थितीही दाखविण्यात येते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर ‘हायटेक’ नजर ठेवण्यास सुरुवात झाली आहे. नागपुरातील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी चक्क ‘बायोमेट्रिक’ प्रणालीचा उपयोग सुरू केला असून या माध्यमातून विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदविण्यात येत आहे.विदर्भातील अशाप्रकारचा हा पहिलाच अभिनव प्रयोग असल्याचा दावा करण्यात आला आहे.
शिकवणी वर्गांमुळे अकरावी-बारावीदरम्यान विद्यार्थी महाविद्यालांमध्ये येऊन वर्गाला उपस्थिती लावत नाहीत. शिकवणी वर्गांशी ‘लिंक’ असलेल्या अनेक महाविद्यालयांत तर त्यांना तशी सूटच देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वर्गांमध्ये ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. परंतु महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी अनुपस्थित असतानादेखील हजेरीपुस्तकावर त्यांना हजर दाखविण्यात येते. शिक्षण उपसंचालक कार्यालायाकडून विद्यार्थ्यांच्या हजेरीसंदर्भात यंदा काही महाविद्यालयांना नोटीसदेखील बजाविण्यात आल्या होत्या. शिवाय वर्गांमध्ये उपस्थित नसल्यामुळे विद्यार्थ्यांचेदेखील शैक्षणिक नुकसान होण्याचा धोका असतो व महाविद्यालयांचे महत्त्वच संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
वरील बाबी लक्षात घेऊन हुडकेश्वर येथील सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाने ‘हायटेक’ हजेरीचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला व या वर्षीपासूनच त्याची अंमलबजावणी सुरू केली.
यासाठी महाविद्यालयाने तीन ‘बायोमेट्रिक मशीन’ लावल्या असून शाळेत आल्यानंतर विद्यार्थ्यांना तेथे ‘पंचिंग’ अनिवार्य करण्यात आले आहे. त्यापद्धतीचे ओळखपत्रदेखील त्यांना बनवून देण्यात आले आहेत. विद्यार्थी महाविद्यालयात उपस्थित राहणे आवश्यकच आहे. त्यांना शिस्त लागावी, तसेच उपस्थिती वाढावी आणि आमच्याकडेदेखील अधिकृत ‘डाटा’ उपलब्ध रहावा, यासाठी आम्ही हे पाऊल उचलले असल्याचे शाळेचे संचालक राजाभाऊ टाकसाळे यांनी सांगितले.
बाहेरील राज्यांत आहे प्रणाली
महाराष्ट्रात मुंबईमधील मोजक्या महाविद्यालयांत हजेरीची ही प्रणाली दिसून येते. तर बाहेरील राज्यांमध्येदेखील काही ठिकाणी ही प्रणाली राबविण्यात येते. उत्तर प्रदेश शासनाने यासंदर्भात निर्णय घेतला होता. राजस्थान, कर्नाटक या राज्यांतदेखील काही ठिकाणी ‘पायलट प्रोजेक्ट’ राबविण्यात आले होते.
महाविद्यालयांनी तंत्रज्ञानाचा आधार घ्यावा
शिकवणी वर्गांची ‘क्रेझ’ इतकी वाढली आहे की कनिष्ठ महाविद्यालयांचे महत्त्व संपण्याच्या मार्गावर आहे. शासनाकडूनदेखील या बाबीला गंभीरतेने घेण्यात येत आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांची प्रामाणिकपणे उपस्थिती नोंद व्हावी, तसेच गैरप्रकार नियंत्रणात यावे, यासाठी महाविद्यालयानी तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची आवश्यकता आहे.