आता रुळांवर येताहेत लघू व मध्यम उद्योग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:07 IST2021-05-30T04:07:33+5:302021-05-30T04:07:33+5:30
नागपूर : कोरोनाच्या दुस-या लाटेचा परिणाम लघू व मध्यम उद्योगांवर झाला आहे. या काळात मालाचे उत्पादन सुरू होते, पण ...

आता रुळांवर येताहेत लघू व मध्यम उद्योग
नागपूर : कोरोनाच्या दुस-या लाटेचा परिणाम लघू व मध्यम उद्योगांवर झाला आहे. या काळात मालाचे उत्पादन सुरू होते, पण लॉकडाऊनमध्ये वितरण आणि विक्रीची साखळी बंद असल्याच्या परिस्थितीत काहीच उद्योग तग धरू शकले. अनेक उद्योजक उत्पादन बंद करून सुस्थितीची वाट पाहत आहेत. रुग्णसंख्या कमी होऊ लागताच लघू व मध्यम उद्योगांची गाडी रुळांवर यायला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी लोकमतला दिली.
लॉॅकडाऊनमुळे ऑर्डर कमी झाल्याने कंपन्यांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. काही उद्योग जुन्या ऑर्डरमुळे तग धरू शकले. पण, आता ऑर्डर नसल्याने पुढे उद्योग चालविणे मालकांना कठीण झाले आहे. काही दिवसांनंतरच उद्योगांवर विपरित परिणाम दिसून येणार आहे. गेल्यावर्षी कोरोनाकाळात हिंगणा आणि बुटीबोरी औद्योगिक वसाहतींतील अनेक कंपन्या कायमच बंद तर काहींमध्ये उत्पादन ठप्प झाले आहे. त्यामुळे दीड वर्षांपासून मंदीत असलेली नागपूरची अर्थव्यवस्था आणखी मंदीत येणार आहे. सरकारने उद्योजकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी उद्योजकांची आहे.
सध्या कारखान्यांचा परिसर सॅनिटाइज्ड करून कामगारांना मास्कवाटप, लसीकरण आणि त्यांच्या प्रकृतीची काळजी घेऊन कारखाने सुरू आहेत. कोरोना रुग्ण आढळल्यानंतरही कारखान्यांची स्थिती खराब झालेली नाही. आता राष्ट्रीयीकृत बँकांनीही उद्योजकांना आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. बँकांतर्फे उद्योजकांना कर्ज व व्याज भरण्यासाठी मुदतवाढ आणि आर्थिक मदतीसाठी मेसेज येत आहेत. त्यामुळे आता सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली असून बँकांच्या मदतीने उद्योगांना उभारी येणार आहे. सार्वजनिक आणि कॉर्पोरेट कंपन्या मालाची उधारी निर्धारित वेळेत देत नाहीत. हासुद्धा उद्योगांच्या विकासात महत्त्वाचा अडथळा समजला जातो.
आर्थिक पुरवठा महत्त्वाचा
हिंगणा एमआयडीसीमधील कारखान्यांची स्थिती चांगली नाही. दुस-या लाटेमुळे अनेक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. आता कारखान्यांना आर्थिक पुरवठा महत्त्वाचा आहे.
चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, हिंगणा एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन
सध्या ५० टक्केच उत्पादन
बुटीबोरी औद्योगिक परिसरात ५० टक्के अर्थात ३३० कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांमध्ये ५० टक्के उत्पादन होत आहे. सकारात्मक परिस्थितीसाठी आणखी काही महिने लागतील.
प्रदीप खंडेलवाल, अध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
बँकांनी घेतला मदतीसाठी पुढाकार
अनेक कारखाने बंद आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पण, आता राष्ट्रीयीकृत बँकांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे कारखान्यांची स्थिती सुधारेल, शिवाय उद्योग नव्याने सुरू होण्यासाठी मदत मिळेल.
मिलिंद कानडे, वरिष्ठ उपाध्यक्ष, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
उत्पादन क्षमता वाढणार
कोरोनाकाळात विविध अडचणींमुळे उद्योजकांच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला होता. पण, आता स्थिती सुधारत असून उत्पादन क्षमता वाढणार आहे. त्याचा उद्योगांना फायदा होईल.
अमर मोहिते, अध्यक्ष, कळमेश्वर इंडस्ट्रीज असोसिएशन