आता संयम संपला
By Admin | Updated: November 13, 2016 02:33 IST2016-11-13T02:33:21+5:302016-11-13T02:33:21+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली.

आता संयम संपला
बँकांपुढे रांगाच रांगा
एटीएममध्ये ठणठणाट
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ५०० आणि १००० हजार रुपयाच्या नोटा चलनातून बंद करण्याची घोषणा केली. संपूर्ण देशाने या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत केले. नवीन नोटा मिळण्यास एक दोन दिवस अडचण होईल, ही अपेक्षा धरून नागरिकांनी दोन नव्हे तर तीन दिवस त्रास सहन केला. परंतु चार दिवस उलटूनही बँकांमधील नागरिकांच्या रांगा कायम आहे. बहुतांश एटीएम बंद आहेत. काही एटीएम सुरू होतात तर तासाभरात पैसे संपतात. नागरिकांजवळ खर्च करायला रुपये नाहीत. साध्या चहाच्या दुधासाठी सुटे पैसे शिल्लक राहिले नाही, अशी अवस्था झाली आहे. आपली कामे सोडून लोक बँकेत रांगा लावत आहेत. सकाळी आलेल्या व्यक्तीचा सायंकाळी नंबर लागूनही नवीन रुपये मिळतीलच याची शाश्वती नाही. एकूणच परिस्थिती हाताळण्यास व्यवस्था अपयशी ठरली आहे. त्याचा फटका मात्र सामान्य व्यक्तीला बसला आहे. त्यामुळे आता गरीब असो की मध्यमवर्गीय, नागरिकांची सहनशीलता संपत असून त्यांच्या मनातील संताप आता उघडपणे समोर येऊ लागल्याचे चित्र शनिवारी दिसून आले.
शहरात चौथ्या दिवशी सुद्धा बँकांपुढे नागरिकांच्या रांगा होत्या. १० वाजता बँक उघडत असेल तर लोक सकाळी ८ ते ९ वाजेपासूनच बँकापुढे रांगा लावून उभे होते. शहरातील सर्वच भागातील बँकांमध्ये नागरिकांचा रांगा होत्या. जवळपास ४ ते ४.३० वाजता रुपये संपल्याचे कारण सांगून बँकेचे गेट बंद करण्यात आले. त्यामुळे रांगेत असलेल्या नागरिकांना रिकाम्या हाती माघारी जावे लागले. सीताबर्डी येथे बँकेत शाखेत सकाळपासूनच लोकांनी गर्दी केली होती. दोन दोन तासानंतर लोकांचा नंबर लागत होता. पैसे भरणे आणि काढण्याचे दोन काऊंटर उघडण्यात आले होते तर एक काऊंटर चलन बदलवण्यासाठी होते. तरीही एखादे काऊंटर आणखी सुरू करावे, अशी नागरिकांची अपेक्ष होती. बहुतांश बँकेत सारखीच स्थिती होती.
जिल्हाधिकारी घेणार अधिकाऱ्यांची बैठक
५०० व १००० रुपयाच्या नोटा १४ नोव्हेंबरपर्यंत चालतील, असे शासनाने जाहीर केले आहे. तसेच वारंवार निर्देश जारी केल्यानंतरही रुग्णालये, पेट्रोल पंप आणि काही शासकीय संस्थांमध्ये ५०० व १००० रुपयाच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारीला जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतले असून यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. नागरिकांना होत असलेल्या या अडचणीसंदर्भात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे बँक अधिकारी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यांना नागरिकांना येत असलेल्या अडचणी दूर करण्याचे निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकेत काऊंटर वाढविणे आदीसंदर्भातही सूचना केल्या जातील. बँकेत पुरेशा नोटा उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचण येत आहेत. आम्ही रिझर्व्ह बँकेच्या संपर्कात आहोत. रिझर्व्ह बँकेतर्फे लवकरच हेल्पलाईन सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले.