लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय प्रबंध संस्थान (आयआयएम) नागपूरतर्फे कामकाज करणाऱ्या व्यावसायिकांसाठी तयार करण्यात आलेल्या पहिल्या ब्लेंडेड एमबीए फॉर वर्किंग प्रोफेशनल्स कार्यक्रमाचा शुभारंभ २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयआयएम परिसरात होणार आहे. आपल्या नोकरी व्यवसायात खंड न पाडता स्वतःची नेतृत्वक्षमता आणि धोरणात्मक दृष्टी अधिक बळकट करू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांसाठी हा अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान आयआयएम नागपूरचे संचालक डॉ. भीमराया मेत्री भूषवणार आहेत. केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. एन. मुत्थुकुमार हे प्रमुख अतिथी असतील, तर मॅकॅफी सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडचे हेड ऑफ चॅनेल मार्केटिंग (इंडिया आणि मिडल ईस्ट) नीलाभ नाग हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
आयआयएम नागपूरचा हा विशेष एमबीए अभ्यासक्रम जागतिक दर्जाचा असून यात वित्त, विपणन, ऑपरेशन्स, धोरण, नेतृत्व यांसारख्या मुख्य व्यवस्थापन विषयांबरोबरच डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शाश्वतता यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांचाही समावेश आहे. म्हणजे, देशाच्या विविध राज्यांतील उमेदवारांसोबतच काही विदेशी विद्यार्थ्यांनीदेखील या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतला आहे.