आता मुलांनी लढावी शेतकरी बापाची लढाई
By Admin | Updated: October 9, 2016 02:32 IST2016-10-09T02:32:11+5:302016-10-09T02:32:11+5:30
ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे.

आता मुलांनी लढावी शेतकरी बापाची लढाई
अमर हबीब : दोन दिवसीय व्याख्यानमालेचा समारोप
नागपूर : ज्याची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे तो शेतकरी, अशी शेतकऱ्याच्या व्याख्येची शासन दफ्तरी नोंद आहे. परंतु आज राजकीय नेत्यांपासून तर चित्रपट कलावंतांपर्यंत सर्वच शेतकरी झाले आहेत. पैसा ओतून फुलवलेल्या त्यांच्या मळ्यातील प्रयोगशीलतेच्या कथा सर्वत्र छापून येत आहेत आणि दुसरीकडे शेतकऱ्याची आत्महत्या आता बातमीचाच विषय राहिलेला नाही. ही विसंगती आजच्या व्यवस्थेने निर्माण केली आहे. ती बदलायची असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलांनी आता या लढ्याचे नेतृत्व करायला पुढे यावे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत व पत्रकार अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती संघर्ष वाहिनी व महाराष्ट्र गांधी स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरबा भवनात आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेचा आज शनिवारी त्यांच्या व्याख्यानाने समारोप झाला. यावेळी ते बोलत होते. ‘जनआंदोलनापुढील आव्हाने व शेतकरी आत्महत्यांचे वास्तव’ असा आजचा विषय होता. अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी व त्यांच्यासोबत मंचावर महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील, जनमुक्ती संघर्ष वाहिनीचे संयोजक डॉ. प्रकाश तोवर उपस्थित होते. अमर हबीब पुढे म्हणाले, शेतकरी आत्महत्यांकडे शंकेच्या दृष्टीने बघितले जाते. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली आहे, गावे संपन्न झाली आहेत. मग शेतकरी का आत्महत्या करतोय, असा प्रश्न विचारला जातोय. हा प्रश्नच चुकीचा आहे. गावातील संपन्नता शेतीच्या उत्पादनातून आलेली नाही. ज्या शेतकऱ्यांनी आपली मुले शहरात नोकरीसाठी पाठवली त्यांच्या कष्टातून चार पैसे गावातल्या माय-बापांना मिळत आहे. शेतीची दैनावस्था आहे तशीच कायम आहे. त्यात पुन्हा सिलिंगसारख्या कायद्यांनी श्ेतकऱ्यांचे जगणे हराम करून टाकले आहे. शेतकरी संघटित नाही त्यामुळे त्याचा आवाज तितक्या प्रभावीपणे सरकारच्या दरबारात पोहोचत नाही. तो पोहोचवायची ताकदही आता खंगलेल्या शेतकऱ्यांमध्ये फारशी उरलेली नाही.
या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे करण्यास सरकारला बाध्य करायचे असेल तर शेतीपासून लांब शहरात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढे येणे गरजेचे आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आज ८ आॅक्टोबर हा लोकनायक जयप्रकाश नारायण यांचा स्मृतिदिवस असल्याने त्यांनी जेपींच्या जातीअंताच्या लढ्यातील आठवणीही श्रोत्यांना सांगितल्या. या कार्यक्रमाचे संचालन रेखा देवघरे यांनी केले.(प्रतिनिधी)