सिकलसेल रुग्णांसाठी आता डे केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:07 IST2021-01-09T04:07:23+5:302021-01-09T04:07:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पाचपावली येथील प्रसूतिकागृहात सिकलसेल रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी ...

सिकलसेल रुग्णांसाठी आता डे केअर सेंटर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाचपावली येथील प्रसूतिकागृहात सिकलसेल रुग्णांसाठी डे केअर सेंटर सुरू करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले. तसेच आरोग्य विभागास सिकलसेल डे केअर सेंटर सुरू करण्यासाठी सविस्तर अध्ययन करून प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. यासाठी सिकलसेल सोसायटीची मदत घेण्यात यावी. इतकेच नव्हे तर सिकलसेल रुग्णांसाठी समुपदेशन केंद्रसुद्धा सुरू केले जाऊ शकते, असेही सांगितले.
गुरुवारी आयोजित बैठकीत महापौर बोलत होते. यावेळी महापौरांनी विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यासाठी मनपा मुख्यालयात साहाय्यता केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी प्रस्तावित २७ प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व १० नागरी सामुदायिक आरोग्य केंद्राची माहितीही घेतली. महापौरांनी सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आरोग्य व्यवस्था मजबूत करण्याची योजना आखली आहे. १० मोबाईल दवाखाने आणि जननी सुरक्षा योजनेंतर्गत गर्भवती महिलांसाठी विशेष वाहनांची व्यवस्था करण्यास सांगितले.
या बैठकीत उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके, आरोग्य समितीचे सभापती वीरेंद्र कुकरेजा, वरिष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद मेश्राम आदी उपस्थित होते.
यावेळी राम जोशी यांनी सांगितले की, दोन नागरी सामुदायिक आरोग्य केंद्र मिनीमातानगर व नारी येथे उघडण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यासाठी निधीसुद्धा मंजूर झाला आहे.
बॉक्स
सुरेंद्रगड येथील विद्यार्थ्यांशी महापौरांनी साधला संवाद
सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी महापौर दयाशंकर तिवारी यांनी भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापौर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या मनात अनेक कल्पना असतात. त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. सोशल मीडियामुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना व्यापक स्वरूप मिळाले आहे. तामिळनाडूतील रामेश्वरम येथे जागतिक रेकॉर्डसाठी देशभरातील एक हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यात मनपाच्या सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळेतील स्वाती मिश्रा व काजल शर्मा या विद्यार्थिंनीचाही समावेश आहे. महापौरांनी शुक्रवारी स्वत: शाळेत जाऊन दोघींची भेट घेतली. शाळेतील विज्ञान शिक्षिका दीप्ती बिस्ट यांनी माहिती दिली. महापौरांनी शाळेतील प्रयोगशाळेचीही पाहणी केली. मनपा शाळेबाबत आपले विचार बदलण्याची गरज आहे. येथील विद्यार्थी नाव कमवित आहेत. तेव्हा येथील शिक्षण गुणवत्तापूर्ण आहे, हे स्पष्ट होत असल्याचेही महापौर म्हणाले.
बॉक्स
महापौर-उपमहापौर यांची आयुक्तांनी घेतली भेट
नवनिर्वाचित महापौर दयाशंकर तिवारी व उपमहापौर मनीषा धावडे यांची शुक्रवारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी भेट घेतली. शहरातील विकास कामांवर त्यांच्यात चर्चा झाली. यावेळी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, जीवनज्योती ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. रवी वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.