आता चंद्रपूरला ओझोन वायू प्रदूषणाचा धोका

By Admin | Updated: June 4, 2017 14:29 IST2017-06-04T14:29:52+5:302017-06-04T14:29:52+5:30

चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे.

Now Chandrapur is at risk of ozone air pollution | आता चंद्रपूरला ओझोन वायू प्रदूषणाचा धोका

आता चंद्रपूरला ओझोन वायू प्रदूषणाचा धोका

मिलिंद कीर्ती
चंद्रपूर : ओझोन वायू वातावरणाच्या वरच्या भागातील थर असून एकीकडे तो सूर्याच्या अतिनील किरणापासून पृथ्वीचे संरक्षण करीत असतो. तोच ओझोन वायू पृथ्वीवर निर्माण झाल्याने धोकादायक ठरू लागला आहे. चंद्रपूरकरिता वायू व जल प्रदूषणाचा विषय नवीन नाही. परंतु वाढत्या तापमानामुळे नव्याने ओझोन वायू प्रदूषणाचा धोका वाढला आहे. चंद्रपूरसह राज्यातील औरंगाबादमध्येही ओझोनचे प्रमाण वाढल्याची नोंद केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणात करण्यात आली आहे.
वायू प्रदूषणाचे मोजमाप महत्त्वपूर्ण घटक (पार्टिक्युलेट मॅटर) २.५, पीएम १०, कॉर्बन मोनोआॅक्साईड आणि ओझोनच्या प्रमाणावरून केले जाते. ओझोन वायूच्या प्रदूषणाबाबत युरोप व अमेरिकेमधील पर्यावरण मंत्रालय सजग आहे. परंतु भारतात काही वर्षांपूर्वीपर्यंत त्याचे मोजमापही केले जात नव्हते. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ओझोन प्रदूषणाच्या नोंदी घेत आहे. २ जून रोजी ओझोनची इंडेक्स व्हॅॅल्यू औरंगाबादमध्ये १५२ आणि चंद्रपूर शहरात १०७ नोंदविण्यात आली आहे. हे प्रमाण मध्यम स्वरूपाचे (मॉडरेट) आहे. त्यानुसार, ओझोन प्रदूषणाची स्थिती धोकादायक झालेली नाही. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढलेले आहे.
सध्या मध्यम ओझोन प्रदूषणाच्या कक्षेत महाराष्ट्रातील औरंगाबाद व चंद्रपूर या दोन शहरांचा समावेश आहे. नागपूरचेही तापमान वाढत असल्याने या प्रदूषणाच्या कक्षेत नागपूरदेखील समाविष्ट होण्याचा धोका आहे. मध्यम स्वरूपाच्या ओझोन प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसन क्रिया त्रासदायक ठरत असते. फुफ्फुसाचे आजार, अस्थमा आणि हृदयरोगाचाही वाढता धोका आहे. ओझोनचे प्रमाण अधिक असल्यास शेतीच्या उत्पादनात घट होते. तसेच रबर, प्लास्टिकच्या वस्तू लवकर खराब होतात. नागपूर येथील निरीने केलेल्या सर्वेक्षणात मुंबई, रायगडनंतर चंद्रपूरचा वायू प्रदूषणात समावेश आहे. त्यात आता ओझोन प्रदूषणाची भर पडली आहे. सध्या ओझोनचे प्रदूषण प्रमाण मध्यम स्वरूपाचे दाखविण्यात येत आहे.
ओझोन वायू दुय्यम प्रदूषक
जेथे पेट्रोल, डिझेल,, हायड्रोकॉर्बन, नायट्रोजन आॅक्साईड, हायड्रोजन, फ्लोरिन, ब्रोमिन, सल्फर, आणि कोळसा जाळण्यात येतो, तेथे ओझोनची निर्मिती होत असते. हे सर्व चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भूजलात सल्फरचे प्रमाण अधिक आहे. तसेच अनेक वस्त्यांमध्ये कोळसा जाळला जातो. तेथे तापमानही अधिक आहे. त्यामुळे ओझोन निर्मितीचे प्रमाण वाढले आहे. इतर शहरांमध्ये हे सर्व घटक एकाच वेळी जुळून येत नाहीत. त्यामुळे तेथे ओझोन प्रदूषणाचा धोका दिसून येत नाही.

वाढत्या तापमानामुळे चंद्रपूरमध्ये ओझोन वायू प्रदूषणाचा नवीन धोका येऊ घातला आहे. त्यातून लोकांच्या आरोग्याची समस्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने चंद्रपूरचे वाढते तापमान व ओझोनचा अभ्यास करावा. तापमान वाढू नये, याकरिता सिमेंट काँक्रीटचे रस्ते न बांधणे, घरांना उष्मारोधक रंग देणे, एकाच ठिकाणी उद्योग केंद्रीत न करणे आदी उपाययोजना कराव्यात.
-प्रा. सुरेश चोपणे, अध्यक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, चंद्रपूर.

Web Title: Now Chandrapur is at risk of ozone air pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.