आता नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी

By Admin | Updated: July 29, 2015 02:53 IST2015-07-29T02:53:09+5:302015-07-29T02:53:09+5:30

पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे.

Now ban Nylon Manja | आता नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी

आता नायलॉन मांजा वापरण्यावर बंदी

अधिसूचना जारी : हायकोर्टात याचिका निकाली
नागपूर : पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा व त्यासारखा अन्य कोणताही धोकादायक कृत्रिम धागा वापरण्यावर राज्य शासनाने बंदी आणली आहे. याशिवाय, मकरसंक्रांतीच्या काळात ठोक विक्रेत्यांना नायलॉन मांजाचा साठा व विक्री करता येणार नाही. काही महिन्यांपूर्वी पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी पर्यावरण (संरक्षण) कायदा-१९८६ मधील कलम ५ अंतर्गत यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. परिणामी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी संबंधित फौजदारी रिट याचिका निकाली काढली.
गेल्या ७ जानेवारी रोजी सहपोलीस आयुक्तांनी नायलॉन मांजाचा वापर, तर सीताबर्डीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी नायलॉन मांजा विक्रीवर बंदीचा आदेश जारी केला होता. याविरुद्ध रिद्धी सिद्धी पतंग व्यापारी संघटनेने ही याचिका दाखल केली होती. तसेच, नायलॉन मांजाची विक्री व वापरावरील बंदी कायम ठेवण्यासाठी पीपल्स फॉर अ‍ॅनिमल्स संस्थेच्या करिश्मा गलानी व अनिल आग्रे यांनी याप्रकरणात दोन वेगवेगळे मध्यस्थी अर्ज दाखल केले होते. शासनाने नायलॉन मांजाच्या वापरावरील बंदीसंदर्भात ठोस धोरण निश्चित केले नसल्याची बाब प्रकरणावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या निदर्शनास आली होती. यामुळे न्यायालयाने शासनाला फटकारले होते.
अनिश्चित धोरणामुळे विक्रेत्यांसह सामान्य नागरिकांना त्रास व नुकसान सहन करावे लागते. हे टाळण्यासाठी पतंग उडविण्याच्या मोसमात नायलॉन मांजाची विक्री व वापर सुरू ठेवायचा की, कायमची बंदी आणायची यावर ठोस निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका व संबंधित मध्यस्थी अर्ज निकाली काढले. शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)

Web Title: Now ban Nylon Manja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.