अनुभवांचे वेगळेपण व्यक्त करणारी कादंबरी
By Admin | Updated: June 26, 2014 00:55 IST2014-06-26T00:55:30+5:302014-06-26T00:55:30+5:30
अश्वमेध ही केवळ राजकीय कादंबरी नाही. विशिष्ट कालखंडात घडणारे समाजवास्तव यात आहे. विनाअनुदानित शाळा अनुदानावर आल्यावर तेथील शिक्षिकांचे शोषण, राजकीय स्थिती यांचे

अनुभवांचे वेगळेपण व्यक्त करणारी कादंबरी
प्राचार्य रा. र. बोराडे : रवींद्र शोभणे यांच्या ‘अश्वमेध’कादंबरीचे प्रकाशन
नागपूर : अश्वमेध ही केवळ राजकीय कादंबरी नाही. विशिष्ट कालखंडात घडणारे समाजवास्तव यात आहे. विनाअनुदानित शाळा अनुदानावर आल्यावर तेथील शिक्षिकांचे शोषण, राजकीय स्थिती यांचे चित्रण करताना यात समाज, शिक्षण, राजकारण आदी वेगवेगळ्या क्षेत्रांतील वास्तव यात त्यांनी कौशल्याने टिपले आहे. साहित्य हे एकाचवेळी साहित्य आणि तत्कालीन माणसांच्या जगण्याचा इतिहासही असते. डॉ. शोभणे यांची ही कादंबरी अनुभवांचे वेगळेपण अभिव्यक्त करणारी आहे. मराठीतील मैलाचा दगड ठरू शकणारी ही कादंबरी आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. र. बोराडे यांनी अध्यक्षस्थानावरुन व्यक्त केले.
विदर्भ साहित्य संघ आणि मॅजेस्टीक पब्लिशिंग हाऊस, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शोभणे यांच्या अश्वमेध कादंबरीचे प्रकाशन वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनोहर म्हैसाळकर, अशोक कोठावळे, डॉ. आशा सावदेकर, डॉ. प्रल्हाद लुलेकर आणि शोभणे उपस्थित होते.
हा कार्यक्रम विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलातील सभागृहात पार पडला. डॉ. डहाके म्हणाले, कादंबरीत समाजातील मूल्यऱ्हास मांडला आहे. देशात प्रत्येक स्त्रीचे शोषण आणि त्यात काही स्त्रियाही सहभागी आहेत. प्रत्येक क्षेत्रातल्या सत्तेसाठी माणसे स्वार्थी झाली आहेत. साधारण १०७५ ते ९१ पर्यंतचा काळ यात लेखकाने मांडला आहे. यात पडद्यामधील पात्रे आहेत पण त्यांचे विकसन लेखकाने सूक्ष्मतेने टिपले आहे. विशिष्ट कालखंडाचा सूक्ष्म अभ्यास यातून मिळतो, असे ते म्हणाले.
प्रल्हाद लुलेकर म्हणाले, प्रशासन आणि शिक्षणव्यवस्था कशी लाचार आहे, हे कादंबरीत टिपले आहे. आपण संस्कृतीप्रमाणे वागत नाही म्हणूनच संस्कृतीची आठवण येते. स्वार्थासाठी मूल्यांना तिलांजली आणि त्यातून क्रौर्य समाजात येते. ७५ नंतर सर्वच क्षेत्रात अध:पतन झाले. हा त्याचाच पट आहे.
अन्न आणि कामक्षुधेने मानसिक संतुलन ढासळते. त्यापलिकडे नैतिक अध:पतन होते. याची मांडणी लेखकाने अभ्यासपूर्ण केली आहे. आशा सावदेकर म्हणाल्या, नागपूर विद्यापीठ, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्या आणि त्या अनुषंगाने समाजवास्तव मांडणारी ही कादंबरी मराठीत महत्त्वाची आहे. यातील गुंतागुंत जातींची नव्हे तर मानवी नातेसंबंधांचीच आहे. हे वास्तव विषण्ण करणारे आहे. अशोक कोठावळे यांनी प्रस्तावना, शुभदा फडणवीस यांनी संचालन तर डॉ. शोभणे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)