कुख्यात संतोष आंबेकर भाच्यासह पोलिसांच्या कस्टडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:37 IST2020-08-29T00:36:47+5:302020-08-29T00:37:58+5:30
कामठीतील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारे या दोघांना कारागृहात जाऊन अटक केली.

कुख्यात संतोष आंबेकर भाच्यासह पोलिसांच्या कस्टडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठीतील व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात गुन्हे शाखेच्या पथकाने कुख्यात गुंड संतोष आंबेकर आणि त्याचा भाचा नीलेश केदारे या दोघांना कारागृहात जाऊन अटक केली. त्यांना कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले आणि त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळवण्यात आला.
विकास जैन नामक व्यापाऱ्याची कोट्यवधी रुपये किमतीची कामठी येथील पावणे तीन एकर जमीन संतोष आणि त्याच्या साथीदारांनी हडपण्याचा प्रयत्न केला होता. गेल्यावर्षी पोलिसांनी संतोषचे गुन्हेगारी साम्राज्य उद्ध्वस्त करून त्याच्याविरुद्ध कारवाई केली. त्याच्या आलिशान वाहनांसह कोट्यवधीची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आणि त्याचा बंगलाही जमीनदोस्त केला. या गुन्ह्यात पोलिसांनी आज संतोष आणि त्याचा भाचा केदारे या दोघांना अटक केली. न्यायालयातून त्यांचा तीन दिवसांचा पीसीआर मिळविण्यात आला. पोलिस या दोघांना कामठीतही घेऊन गेले होते.