कुख्यात गुंड सौरभ वासनिक स्थानबद्ध; येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेणार
By दयानंद पाईकराव | Updated: May 26, 2024 17:29 IST2024-05-26T17:28:54+5:302024-05-26T17:29:01+5:30
सध्या आरोपी सौरभला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.

कुख्यात गुंड सौरभ वासनिक स्थानबद्ध; येरवडा मध्यवर्ती कारागृहात नेणार
नागपूर : पाचपावली व जरीपटका ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात गुंड सौरभ सुधीर वासनिक (२५, रा. कुऱ्हाडकर पेठ, लष्करीबाग, पाचपावली) याला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड सौरभ विरुद्ध दरोडा घालण्यासाठी एकत्र येणे, शस्त्राने दुखापत करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, दंगा करणे, अश्लील शिविगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्याच्या वागणूकीत बदल झाला नाही. त्यामुळे पाचपावलीच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव गुन्हे शाखेकडे सादर केला होता. गुन्हे शाखेने हा प्रस्ताव पोलिस आयुक्तांपुढे सादर केला असता पोलिस आयुक्तांनी आरोपी सौरभला पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला आहे. सध्या आरोपी सौरभला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे.