कुख्यात फातोडे टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:17 IST2021-01-13T04:17:50+5:302021-01-13T04:17:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पांढराबोडीतील कुख्यात गुंड संजय फातोडे आणि त्याची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. अवैध सावकारी ...

कुख्यात फातोडे टोळी सक्रिय
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पांढराबोडीतील कुख्यात गुंड संजय फातोडे आणि त्याची टोळी पुन्हा सक्रिय झाली आहे. अवैध सावकारी करणाऱ्या फातोडे आणि त्याच्या मुलाने पैशाच्या व्यवहारातून एका महिलेला बेदम मारहाण केली. पोलिसांकडे हे प्रकरण जाताच फातोडे गायब झाला आहे.
संजय फातोडे कुख्यात गुंड असून काही महिन्यांपूर्वी तो आणि त्याचा मुलगा अक्षय तसेच साथीदारांनी मानकापुरातील एका सलून दुकानदाराला अवैध सावकारीतून छळल्याचे प्रकरण पुढे येताच गुन्हे शाखेच्या पथकाने फातोडे बापलेकाला अटक केली. त्यानंतर दुसरेही अनेक गुन्हे दाखल करून फातोडेला कारागृहात डांबले. काही दिवसांपूर्वीच फातोडे जामिनावर बाहेर आला आणि त्याने पुन्हा अवैध सावकारी तसेच गुंडगिरी सुरू केली. प्रीती नामक महिलेला आरोपी संजय फातोडे आणि त्याचा मुलगा अक्षयने ऑगस्ट २०१९ मध्ये ३० हजार रुपये व्याजाने दिले होते. फातोडेचा साथीदार राजेश पांडेच्या मध्यस्थीने हा व्यवहार झाला होता. प्रीतीने ठरल्याप्रमाणे मूळ रक्कम, व्याज परत केले. मात्र, ३.३० हजारांचा हिशेब काढून आरोपी फातोडेने महिलेमागे तगादा लावला. तिला नोटीसही पाठवली. ४ जानेवारीला प्रीती फातोडेच्या पांढराबोडीतील कार्यायलात पोहोचली. तेथे आरोपी फातोडे बापलेक व साथीदारांनी तिला मारहाण करून शिवीगाळ केली. रक्कम परत केली नाही, तर गंभीर परिणामाची धमकी दिल्याचे समजते. प्रीतीने या प्रकाराची तक्रार अंबाझरी ठाण्यात नोंदवली. ते माहीत पडताच फातोडे भूमिगत झाला. पोलिसांनी त्याच्या राजेश पांडे (वय ३२, रा. कॅनल रोड) नामक साथीदाराला अटक केली असून फातोडे बापलेकाचा शोध घेतला जात आहे. तो अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
----