कुख्यात ड्रग सप्लायर पप्पू जेरबंद, सिनेस्टाईल कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:15 IST2021-03-07T00:13:26+5:302021-03-07T00:15:25+5:30
Notorious drug supplier Pappu arrested गँगस्टर राजा गाैस याचा भाऊ आणि कुख्यात ड्रग तस्कर ख्वाजा ऊर्फ पप्पू वारिस अली (रा. मोठा ताजबाग) याला एनडीपीएसच्या पथकाने रेल्वेस्थानकावर सिनेस्टाईल जेरबंद केले.

कुख्यात ड्रग सप्लायर पप्पू जेरबंद, सिनेस्टाईल कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गँगस्टर राजा गाैस याचा भाऊ आणि कुख्यात ड्रग तस्कर ख्वाजा ऊर्फ पप्पू वारिस अली (रा. मोठा ताजबाग) याला एनडीपीएसच्या पथकाने रेल्वेस्थानकावर सिनेस्टाईल जेरबंद केले. दुरंतो एक्सप्रेसमधून उतरताच त्याची झाडाझडती घेऊन त्याच्याकडून २ लाख, ३६ हजार रुपये किंमतीची एमडी (मेफेड्रोन पावडर) जप्त केली.
अनेक वर्षांपासून भाईगिरीत सक्रिय असलेला राजा गाैस सध्या कारागृहात बंद आहे. मात्र, त्याच्या साथीदारांना तो कारागृहातूनच संचालित करतो. त्याचा लहान भाऊ ख्वाजा वारिस अनेक दिवसांपासून मादक पदार्थांच्या तस्करीत सक्रिय आहे. तो मुंबईहून एमडीची मोठी खेप घेऊन नागपुरात पोहोचणार असल्याची टीप गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून शनिवारी पोलिसांनी रेल्वेस्थानक परिसरात सापळा लावला. पप्पू रेल्वेतून उतरताच एनडीपीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे २२.१० मिलीग्राम एमडी सापडले. ती जप्त करण्यात आली असून अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सार्थक नेहते, सहायक निरीक्षक सुरेश सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.