कुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2022 19:42 IST2022-04-11T19:41:28+5:302022-04-11T19:42:21+5:30
Nagpur News मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने अभिवचन रजेकरिता (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे त्याने ही रजा मागितली आहे.

कुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलसाठी हायकोर्टात धाव
नागपूर : मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने अभिवचन रजेकरिता (पॅरोल) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. पत्नी आजारी असल्यामुळे त्याने ही रजा मागितली आहे.
गवळीने रजा मिळविण्यासाठी सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे अर्ज सादर केला होता. तो अर्ज नामंजूर करण्यात आला. गवळी गुन्हेगारांच्या टोळीचा म्होरक्या आहे. त्याला रजेवर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण होईल, या कारणामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यापूर्वी रजेवर सुटल्यानंतर कायदे व नियमांचे काटेकोर पालन केले. करिता, यावेळीही रजा नाकारता येणार नाही असे त्याचे म्हणणे होते. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. तो नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे.
सरकारला नोटीस
गवळीच्या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर २९ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. गवळीतर्फे ॲड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.