नागपुरातील कुख्यात गुन्हेगार रोशन महातो जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:44 IST2018-10-26T00:43:11+5:302018-10-26T00:44:50+5:30
हत्या आणि हत्येचा प्रयत्न करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड रोशन सुभाष कामकर ऊर्फ महातो (वय २२, न्यू कैलासनगर अजनी) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले.

नागपुरातील कुख्यात गुन्हेगार रोशन महातो जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हत्या आणि हत्येचा प्रयत्न करून लुटमार केल्याच्या गुन्ह्यात तीन वर्षांपासून फरार असलेला कुख्यात गुंड रोशन सुभाष कामकर ऊर्फ महातो (वय २२, न्यू कैलासनगर अजनी) याच्या मुसक्या बांधण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले.
२६ जून २०१५ ला दुपारी आरोपी रोशन आणि त्याच्या १२ साथीदारांनी गिट्टीखदानमधील मोहित मार्टिन पीटर (वय २३, रा. मार्टिननगर) याच्या कार्यालयात शिरून त्याची निर्घृण हत्या केली होती. तर, मार्टिनचा सहकारी निखिल मायकल फ्रान्सिस (वय १८, रा. मानकापूर) याच्या हत्येचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात आरोपींनी मार्टिनच्या तसेच निखिलच्या अंगावरचे सर्व सोनेही लुटून नेले होते. त्यातील रोशन वगळता सर्व आरोपींना अटक झाली होती तर रोशन तीन वर्षांपासून पोलिसांना चुकवत होता. न्यायालयातून पकड वॉरंट निघताच गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने रोशनच्या अटकेसाठी प्रयत्न केले. अखेर तो त्याच्या घरी आल्याचे कळताच गुरुवारी रोशन कामकर ऊर्फ महातो याच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्या. पोलीस उपायुक्त चिन्मय, सहायक पोलीस आयुक्त मराठे आणि गिट्टीखदानचे ठाणेदार विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जॉन, हवालदार अनिल गेडाम, चुन्नीलाल धुर्वे आणि सुनील नंदेश्वर यांनी ही कामगिरी बजावली.