शरीरच नव्हे स्वप्नही झाले हद्दपार!
By Admin | Updated: January 31, 2015 02:10 IST2015-01-31T02:10:30+5:302015-01-31T02:10:30+5:30
रोज चुरगळल्या जाणाऱ्या देहाला पुन्हा-पुन्हा लालीपावडर लावून बाजारात मांडणारी बाई ही समाजाच्या दृष्टीने वारांगना असली तरी ...

शरीरच नव्हे स्वप्नही झाले हद्दपार!
नरेश डोंगरे/शफी पठाण नागपूर
रोज चुरगळल्या जाणाऱ्या देहाला पुन्हा-पुन्हा लालीपावडर लावून बाजारात मांडणारी बाई ही समाजाच्या दृष्टीने वारांगना असली तरी अन् दिवस-रात्रींच्या पिंजऱ्यात सुकणं-गळणं-तुटणं हे तिचे प्राक्तन असले तरी काळाचे घाव सोसून दगड झालेल्या तिच्या शरीरामागे आईचे एक हळवे मनही असते आणि या मनात ती आपल्या चिल्यापिल्यांच्या उज्ज्वल आयुष्याचे स्वप्नही रंगवत असते़ नागपुरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील वारांगनांच्या मनातील स्वप्नही याहून वेगळे नव्हते़ परंतु कायद्याला इतक्या वर्षांनी अचानक ही वस्ती शहरावरचा कलंक असल्याची जाणीव झाली आणि त्यांनी एका क्षणात साऱ्या वारांगनांना हद्दपार करून टाकले़ पण, या कारवाईने नुसते शरीर हद्दपार झाले नाही तर येथील वारांगनांनी पाहिलेले मुलांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्नही हद्दपार झाले आहे़ आता कुठे आशावादाची अक्षरे उमटायला लागली असताना पोलिसांनी जणू या विद्यार्थ्यांची पाटीच फोडून टाकली आहे़ ही फुटलेली पाटी या विद्यार्थ्यांना कुठले दिवस दाखवील याचा विचार आता समजानेच करणे गरजेचे आहे़
‘चिंतेश्वर’ला चिंता, शिक्षकही झाले अस्वस्थ
नैतिकतेचा हवाला देत पोलिसांनी वारांगनांवर कारवाईचा आसूड ओढल्याने त्याचा फटका वारांगनांच्या मुलांनाही बसला आहे. आईसोबत त्यांनी आपली वस्तीच नव्हे तर शाळाही सोडली आहे. त्यामुळे एकीकडे शाळा ओसाड पडली आहे तर दुसरीकडे शाळा सोडून निघून गेलेल्या ३००वर मुलांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इंग्रज राजवटीपासून नागपुरात गंगाजमुना वस्ती आहे. वारांगनांच्या या वस्तीतील बहुतांश जणी हौसेने नव्हे तर विवशतेने हा धंदा करीत आहेत. सुमारे १००० वारांगनांची ३ ते १३ वयोगटातील २ हजार मुले या वस्तीत असून, त्यातील ४५० ते ५०० मुल-मुली वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकतात. यातील सर्वाधिक १७५ मुले-मुली चिंतेश्वर प्राथमिक शाळेत, तर १३१ मुले-मुली शरणस्थान या निवासी शाळेत शिकतात़ अन्य मुले मुली आजूबाजूच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये जायच्या़ शरणस्थानमधील मुले वगळता इतर सर्वच शाळांमधील मुलांनी गेल्या आठ दिवसांपासून शाळांमध्ये पाय ठेवलेला नाही. कारण त्यांना शाळाच नव्हे तर गाव सोडून जावे लागले आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तरार्ध सत्र सुरू असताना गंगाजमुनातील ३०० वर मुले अचानक शाळा सोडून गेल्यामुुळे संबंधित शाळांमधील शिक्षकही अस्वस्थ झाले आहेत.