तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2023 21:18 IST2023-06-22T21:17:42+5:302023-06-22T21:18:14+5:30
Nagpur News मान्सूनला अद्याप सुरुवात झाली नाही. उकाडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक भागांत पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु नागपूर जिल्ह्याची परिस्थिती मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येते.

तूर्तास चिंता नाही; नागपुरातील तलावांमध्ये ५०.८८ टक्के जलसाठा!
नागपूर : मान्सूनला अद्याप सुरुवात झाली नाही. उकाडा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक भागांत पाणी संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे; परंतु नागपूर जिल्ह्याची परिस्थिती मात्र समाधानकारक असल्याचे दिसून येते. नागपुरातील सर्व जलाशयांमध्ये आजच्या घडीला ५० टक्क्यांपेक्षा अधिक साठा उपलब्ध आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण ५ मोठे प्रकल्प, १२ मध्यम व ६० लघु प्रकल्प, असे मिळून एकूण ७७ जलाशये आहेत. यातील एकूण पाणीसाठा क्षमता १७७७.७३ दलघमी आहे. यात सध्या २२ जून रोजी ९०४.५१६ दलघमी म्हणजेच ५०.८८ टक्के जलसाठा आहे.
मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा क्षमता १४५० दलघमी आहे. यात ७९३ दलघमी साठा आहे. मध्यम प्रकल्पात ३३ टक्के, तर लघु प्रकल्पात ३४ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी आजच्याच तारखेला नागपुरातील सर्व प्रकल्प मिळूण एकूण ४५ टक्के पाणीसाठा होता. एकूण ५० टक्क्यांवर पाणीसाठा असल्याने नागपुरातील पाण्याची स्थिती चांगली असल्याचे सांगितले जाते.