युद्ध नको, आत्मरक्षणाची सज्जता हवी
By Admin | Updated: January 16, 2015 01:01 IST2015-01-16T01:01:14+5:302015-01-16T01:01:14+5:30
जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या

युद्ध नको, आत्मरक्षणाची सज्जता हवी
पुस्तक प्रकाशन : ताराचंद्र खांडेकर यांचे प्रतिपादन
नागपूर : जगाचे प्रश्न हे युद्धाने सुटत नाही, ही बाब खरी असली तरी आत्मरक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आपल्याला आत्मरक्षणासाठी लष्करीदृष्ट्या सज्ज राहावेच लागते, त्याचप्रमाणे समाजाच्या आत्मरक्षणाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व समीक्षक ताराचंद्र खांडेकर यांनी केले.
अॅड. विमलसूर्य चिमणकर लिखित ‘द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन बुधवारी सायंकाळी भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खांडेकर बोलत होते. डॉ. आंबेडकर सभागृह उरुवेला कॉलनी येथे समता संगरतर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर आंबेडकरी विचारवंत डॉ. विमलकीर्ती हे प्रमुख अतिथी होते. खांडेकर म्हणाले, बाबासाहेबांचे युद्धासंबंधीचे विचार अतिशय मौलिक होते. परंतु त्यांचे ते विचार अनुल्लेखाने मारल्या गेले. बाबासाहेबांनी युद्ध नाकारले, हे अर्धसत्य आहे.
संरक्षणासाठीच त्यांनी समाजामध्ये लष्करी सज्जतेची बीजे रुजविण्याचा प्रयत्न केला. त्यांना सैनिकीकरण हवे होते. आजचा विचार केल्यास समाजाला आत्मरक्षणासाठी या सैनिकी सज्जतेची अधिक गरज असल्याचे दिसून येत.
डॉ. विमलकीर्ती यांनी जगाला युद्ध नको तर बुद्ध हवा असल्याचे स्पष्ट करीत अहिंसेच्या मार्गानेसुद्धा परिवर्तन घडवून आणता येते, हे डॉ. आंबेडकरांनी दाखवून दिले असल्याचे स्पष्ट केले. राजेश भारती यांनी संचालन केले. सुनील सारीपुत्र यांनी भूमिका विशद केली आणि आभार मानले. (प्रतिनिधी)
केतन पिंपळापुरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
याप्रसंगी कवी केतन पिपंळापुरे यांना विश्वेंदू जयभीम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व १५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच मुंबईतील मिलिंद महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. पद्माकर तामगाडगे यांना भीमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यासोबतच युवा चित्रकार महेश मानकर यांचा अजिंठा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी इंदिरा पिंपळापुरे या व्यासपीठावर उपस्थित होत्या.