मनपा रुग्णालयात नाही अॅण्टी रॅबिज व्हॅक्सिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST2020-06-10T00:04:38+5:302020-06-10T00:06:26+5:30
महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली.

मनपा रुग्णालयात नाही अॅण्टी रॅबिज व्हॅक्सिन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिका प्रशासन आरोग्य सेवेसंदर्भात मोठमोठे दावे करते, पण या क्षेत्रात अद्यापही समाधानकारक सुधारणा झाली नाही. याची उदाहरणे नेहमीच पाहायला मिळतात. मंगळवारी एका घटनेमुळे प्रशासनाची पुन्हा पोलखोल झाली.
ही घटना दुपारी १२.१५ वाजताची आहे. लकडगंज येथील ऋषभ आवळे हा युवक दुचाकीने घरी जात होता. दरम्यान, लकडगंज पोलीस ठाण्याजवळ काही कुत्री त्याच्या अंगावर धावून गेली. एका कुत्र्याने त्याच्या पायाचा चावा घेतला. त्यानंतर त्याने उपचारासाठी प्रभाकरराव दटके मनपा रुग्णालयात धाव घेतली, पण त्याची निराशा झाली. डॉक्टरांनी त्याला अॅण्टी रॅबिज व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याचे सांगून हे व्हॅक्सिन बाहेरून खरेदी करण्याचा सल्ला दिला. अधिक विचारपूस केल्यानंतर डॉक्टरांनी या रुग्णालयात चार महिन्यापासून व्हॅक्सिन उपलब्ध नसल्याची माहिती दिली. या घटनेमुळे मनपा रुग्णालयातील अव्यवस्थेची पोलखोल झाली. ऋषभला निराश होऊन घरी परतावे लागले.
लकडगंजमध्ये कुत्र्यांची दहशत
लकडगंज भागात बेवारस कुत्र्यांची दहशत आहे. ती कुत्री येणाऱ्या-जाणाऱ्यांवर धावून जातात. यासंदर्भात महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करूनही काहीच कारवाई करण्यात आली नाही, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.