नागपूर : दगाबाजीचे राजकारण भाजपने सुरू केले. एक पक्ष फोडून दुसऱ्याला दिला. मात्र शरद पवार यांचे राजकारण कुणीही संपवू शकत नाही. जय-पराजय सुरूच असतो, असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केले.
देशमुख म्हणाले, महाविकास आघाडीतील पक्ष दिल्लीत एकमेकांविरुद्ध लढत आहेत. पण मविआ एकत्र आहे. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होत असतात. २०१४ मध्ये मोदी यांची लाट असताना २८८ जागा असताना १२२ जिंकल्यात; पण यंदा लाट नसताना १४९ जागा लढवून १३२, म्हणजे ८९ टक्के जागा जिंकल्या. मोक्का का लावत नाही? सरपंच हत्या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई व्हावी. वाल्मीक कराड मास्टरमाइंड आहे. सरकारने त्याला वाचविण्याचा प्रयत्न करू नये. कराडवर मोक्का का लावला जात नाही? असा सवाल त्यांनी केला.
'तो बदनामीचा प्रकार' शरद पवार गटाच्या मुंबईतील बैठकीत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावर हटविण्याची मागणी केवळ दोनच लोकांनी केली. तो बदनामी करण्याचा प्रकार असल्याचे मत शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी व्यक्त केले.