लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : २९ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधान परिषद सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मविआकडून उमेदवार देण्यात आलेला नाही. प्रा. शिंदे यांनी बुधवारी अर्ज दाखल केला.
१९ डिसेंबर रोजी सभापतिपदाची निवडणूक होईल. भाजपचे प्रा. राम शिंदे यांचे नाव महायुतीने निश्चित केले. ७ जुलै २०२२ रोजी रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यापासून सभापतिपद रिक्त आहे. शिंदेसेनेने सभापतिपद मिळावे, अशी मागणी केली होती. परंतु, परिषदेत सर्वाधिक सदस्य असलेल्या भाजपने राम शिंदे यांचे नाव लावून धरले.
परिषदेचा सभापती बिनविरोध निवडून यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी इच्छा व्यक्त केली होती. विरोधकांनी त्याचा मान ठेवत माझ्या निवडीला पाठिंबा दिला आहे. याबद्दल आभार मानतो. - राम शिंदे, आमदार