प्रवाशांना भोजन पुरविणाऱ्यांची नाही कुठलीच तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:08 IST2021-05-23T04:08:20+5:302021-05-23T04:08:20+5:30
नागपूर : शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. ...

प्रवाशांना भोजन पुरविणाऱ्यांची नाही कुठलीच तपासणी
नागपूर : शहरात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. अशा स्थितीत प्रशासनाच्या वतीने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वेस्थानकावरही ८ राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे; परंतु ही चाचणी केवळ प्रवाशांपुरतीच मर्यादित असून प्रवाशांना ऑनलाइन भोजन पुरविणारे व्हेंडर मात्र कुठल्याच तपासणीविना रेल्वेस्थानकात प्रवेश करीत आहेत.
प्रवाशांनी ऑनलाइन खाद्यपदार्थांची ऑर्डर दिल्यानंतर खाद्यपदार्थ पुरविणारे व्हेंडर कोणत्याही तपासणीविना रेल्वेस्थानकात शिरून प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यांत प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरवित आहेत. संपूर्ण शहर फिरून रेल्वेस्थानकात प्रवेश करणाऱ्या या व्हेंडरची कोणतीही तपासणी रेल्वेस्थानकात करण्यात येत नाही. रेल्वेस्थानकावर बाहेरील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येत आहे. त्यासाठी प्लॅटफार्म क्रमांक १ वरील पॅसेंजर लाऊंजमध्ये तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु प्रवाशांना खाद्यपदार्थ पुरविणारे व्हेंडर कुठल्याच तपासणी विनापॅसेंजर लाऊंजच्या बाजूने असलेल्या पायऱ्यांनी प्लॅटफार्म आणि रेल्वेगाड्यात जात आहेत. या व्हेंडरची कोणीच विचारपूस करीत नसल्याचे चित्र आहे. त्यांचे तापमानही मोजण्यात येत नाही. यामुळे प्रवाशांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या व्हेंडरची तपासणी करूनच त्यांना आत प्रवेश देण्याची मागणी होत आहे.
...........