सुरक्षिततेसाठी आयुध निर्माणीत 'नो एन्ट्री' : नागरिकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 20:44 IST2020-02-03T20:43:20+5:302020-02-03T20:44:28+5:30
सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

सुरक्षिततेसाठी आयुध निर्माणीत 'नो एन्ट्री' : नागरिकांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुरक्षेच्या कारणावरून अंबाझरी आयुध निर्माणीमध्ये बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. परिणामी, आयुध निर्माणी परिसरातील शाळा, बँक, गॅस एजन्सी आदींकडे कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीही अशी बंदी घालण्यात आली होती, हे येथे उल्लेखनीय.
आयुध निर्माणी परिसरात रविवारी भरणाऱ्या साप्ताहिक बाजारात जाण्यासाठी अनेक जण गेले होते. परंतु, त्यांना प्रवेशद्वार बंद दिसले. आत जाण्यासाठी प्रवेशद्वार उघडण्याची मागणी केली असता, त्यांना बाहेरच्या नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांना बाजारातील खरेदीशिवायच घरी परतावे लागले. या बंदीमुळे वाडी, दत्तवाडी, लावा व सोनबानगर परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
प्रवेशद्वारावर नोटीस
आयुध निर्माणीच्या सुरक्षा विभागाने प्रवेशद्वारावर प्रवेशबंदीचा नोटीस चिकटवला आहे. सुरक्षा व प्रशासकीय कारणांमुळे आयुध निर्माणी परिसरात बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी करण्यात आल्याचे त्यात लिहिले आहे. केवळ परिसरातील क्वॉर्टरमध्ये जाणाऱ्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जात आहे.
कारवाईचा इशारा
आयुध निर्माणीच्या सुरक्षा व्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नोटीसमध्ये देण्यात आला आहे.