२४ तासानंतरही कारवाई नाही, फक्त चौकशीचे सोपस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:07 IST2021-04-11T04:07:43+5:302021-04-11T04:07:43+5:30
जिल्हा प्रशासनासह वाडी नगरपरिषदेचे मौन : गुन्हा दाखल करून चौकशी अहवाल सादर करण्याच्या पालकमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना लोकमत न्यूज ...

२४ तासानंतरही कारवाई नाही, फक्त चौकशीचे सोपस्कार
जिल्हा प्रशासनासह वाडी नगरपरिषदेचे मौन : गुन्हा दाखल करून चौकशी अहवाल सादर करण्याच्या पालकमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर-अमरावती मार्गावरील वाडी येथील वेल ट्रिट हॉस्पिटलमध्ये (कोविड केअर सेंटर) शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत चार रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र, याप्रकरणी नगरपरिषद व जिल्हा प्रशासनाची कमालीची उदासीनता दिसून येते. घटनेच्या २४ तासानंतरही संबंधित रुग्णालयावर कारवाई करणे तर दूर पण साधी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली नाही. केवळ प्राथमिक चौकशीचे सोपस्कार पार पाडले जात असल्याने वाडी नगरपरिषद प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करून सविस्तर चौकशी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.
भंडारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात अशीच आग लागली. तेव्हा राज्य सरकारने तातडीने चौकशी समिती नेमली; परंतु वाडीतील घटनेबाबत मात्र सरकार व प्रशासन या दोन्ही स्तरावर कमालीची उदासीनता दिसून येते. मुळात घटना वाडी नगर परिषद हद्दीत झाली असल्याने याप्रकरणी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून वाडी न.प. प्रशासनाने हॉस्पीटल प्रशासनाला तातडीने नोटीस बजावित घटनेबाबतचा जाब विचारणे आवश्यक होते. मात्र तसे काही झाले नाही. इकडे हॉस्पीटलचे फायर आॅडीट झाले होते का, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीय आहे. झाले असल्यास त्याचे अहवाल न.प.प्रशासन वा हॉस्पीटलकडे आहेत, का याबाबतही अद्याप कुणीही सांगितले नाही. भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णातील अग्निकांडानंतर राज्यभरातील खासगी आणि शासकीय रुग्णालयाच्या फायर ऑडिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता, हे विशेष.
प्राथमिक चौकशी सुर
-वेल ट्रिट हॉस्पिटलला लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून वाडी न. प. प्रशासनाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल सोपविणार आहे.
- जुम्मा प्यारेवाले, मुख्याधिकारी, वाडी न.प.
-------
रुग्णांच्या कुटुंबीयांना भरपाई कधी?
वेल ट्रिट हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणी रुग्णांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनानेही मौन बाळगले आहे. इकडे हॉस्पिटल प्रशासनानेही रुग्णांच्या कुटुंबीयांना आश्वस्त करणे अपेक्षित होते किंवा मदत जाहीर करणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही तसे काही झालेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीव इतके स्वस्त आहेत का, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
विद्युत निरीक्षक स्तरावरही कारवाई
-दरम्यान, आगीच्या घटनेबाबत विद्युत निरीक्षक स्तरावरही कारवाई सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले.
शासकीय व खासगी इस्पितळांचे फायर ऑडिट करा
-दरम्यान, जिल्ह्यातील खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत संबंधित आदेश देण्यात आले. खासगी व शासकीय रुग्णालयांचे फायर ऑडिट करताना तिथे कार्यरत डॉक्टर, नर्स यांना आग लागल्यानंतर करावयाच्या सुरक्षा उपाययोजनांची माहिती द्यावी. यासंबंधी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश राऊत यांनी दिले.
वाडी अग्निकांडात पोलिसांना तक्रारीची प्रतिक्षा
- चाैघांचे बळी घेणाऱ्या अग्निकांडात पोलिसांनी अद्याप गुन्हा का दाखल केला नाही, यासंबंधाने पोलिसांकडे चाैकशी केली असता पोलीस अधिकाऱ्यांना तक्रारीची अथवा संबंधित यंत्रणांच्या चाैकशी अहवालाची प्रतिक्षा असल्याचे स्पष्ट झाले.
चाैघांचे मृत्यू झाले तरी एकाही मृतकाच्या नातेवाईकाने अद्याप पोलिसांकडे रितसर तक्रार केलेली नाही. पोलिसांनी आपली चाैकशी सुरू केली आहे. या अग्निशमन यंत्रणा तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीदेखिल आज घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आग नेमकी कशी लागली, ते जाणून घेण्यासाठी ही चाैकशी होती. त्या चाैकशीतून या आगीला कोण आणि कसे कारणीभूत आहे, त्याचा एस्पर्ट रिपोर्ट संबंधित यंत्रणांकडून पोलीस जाणून घेतील. त्याआधारेच गुन्हा आणि कारवाईची रुपरेषा पोलीस ठरवतील. दरम्यान, मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याची चाैकशी करूनही पोलीस दुसरा गुन्हा दाखल करू शकतात, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले.