‘आपली बस’मध्ये विना मास्क प्रवेश नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:26 IST2020-12-12T04:26:05+5:302020-12-12T04:26:05+5:30

नागपूर : कोव्हिड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. शहरात नागरिकांना परिवहन सेवा देताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक ...

No access to ‘your bus’ without a mask | ‘आपली बस’मध्ये विना मास्क प्रवेश नाही

‘आपली बस’मध्ये विना मास्क प्रवेश नाही

नागपूर : कोव्हिड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. शहरात नागरिकांना परिवहन सेवा देताना सुरक्षेची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. ‘आपली बस’मधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क लावला नसेल तर ‘आपली बस’मध्ये प्रवेश मिळणार नाही.

‘आपली बस’संदर्भात विविध विषयांच्या अनुषंगाने परिवहन समिती सभापती नरेंद्र बोरकर यांनी बसचे संचालन करणारी कंपनी डिम्ट्स, वाहक पुरविणारी कंपनी युनिटी सर्व्हिसेस आणि सर्व चेकर्ससोबत चर्चा केली. मनपा मुख्यालयात झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, लेखा अधिकारी विनय भारद्वाज, राजस्व निरीक्षक समीर परमार, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, डिम्ट्सचे ऑपरेशन हेड कावळे, सतीश सदावर्ते, युनिटी सर्व्हिसेसचे राजेश तळेगावकर आदी उपस्थित होते.

यावेळी बोरकर म्हणाले, बसचे वाहक आणि चालक या दोघांनीही मास्क लावणे बंधनकारक असून ते न लावल्यास त्यांच्याकडून १०० रूपये दंड वसूल करण्यात यावा, असेही निर्देश त्यांनी दिले. याशिवाय ‘आपली बस’चे वाहक, चालक आणि चेकर्स यांनी नियमित गणवेश धारण करणे अत्यावश्यक आहे. संबंधित कंपन्यांनी त्वरित सर्व वाहक, चालक आणि चेकर्स यांना गणवेशाची परिपूर्ती करावी, असेही निर्देश दिले.

दोषींची सुनावणी पागे व पिपरूडे समितीकडे

- ‘आपली बस’मध्ये वाहकांकडून कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये व त्याचा फटका मनपाच्या उत्पन्नावर पडू नये, यासाठी डिम्ट्सला दिलेल्या निर्देशानुसार चेकर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. या चेकर्सवर गैरप्रकारावर आळा घालण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. एखाद्या बसमध्ये तपासणीअंती वाहक दोषी आढळल्यास चेकर्सकडून सरसकट संबंधित वाहकाची आयडी ब्लॉक केली जाते. ही कारवाई करीत असताना गैरप्रकार रोखणे हा उद्देश असला तरी वाहकावर अन्याय होऊ नये, याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित दोषी वाहकाची सरसकट आयडी ब्लॉक न करता त्याची केस तयार करण्यात यावी. सदर केसेस डीम्स कंपनीद्वारे परिवहन विभागाकडे वर्ग केली जाईल. परिवहन समितीद्वारे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे व अरुण पिपरूडे यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती संबंधित वाहक व चेकर यांची सुनावणी घेऊन संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतील. समितीपुढे दोषी आढळणाऱ्या वाहकाला थेट कामावरूनच काढले जाईल, असा इशाराही बोरकर यांनी दिला आहे.

Web Title: No access to ‘your bus’ without a mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.