विजयानंतर कांचन गडकरींनी औक्षण करून दिल्या बावनकुळेंना शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2021 17:06 IST2021-12-14T16:44:59+5:302021-12-14T17:06:08+5:30
विजयानंतर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. तर, नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

विजयानंतर कांचन गडकरींनी औक्षण करून दिल्या बावनकुळेंना शुभेच्छा
नागपूर : राज्यातील संपूर्ण राजकी वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीमध्ये भाजप उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे बाजी मारली. विजयानंतर बावनकुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट दिली. यावेळी कांचनताई गडकरी यांनी बावनकुळेंचे औक्षण करून विजयाबद्दल अभिनंदन केले. तर, नितीन गडकरी यांनी दिल्लीहून फोन करून बावनकुळे यांचे अभिनंदन केले.
या निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मतं मिळाली. रवींद्र भोयर यांना १ तर, काँग्रेसनं ऐनवेळी पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना १८६ मते पडली. त्यांच्या विजयानंतर नागपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
बावनकुळेंच्या विजयानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला. मी स्वत: विजयी झालो, तेव्हा जितका आनंद मला झाला होता, त्यापेक्षाही जास्त आनंद आज झाला आहे, अशा भावना फडणवीसांनी व्यक्त केल्या. विधिमंडळात त्यांनी उत्तम काम केले आणि यापुढे सुद्धा ते जनतेच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत राहतील, अशी भावना व्यक्त केली.
चंद्रकांत पाटलांचं महाविकास आघाडीला खुलं आव्हान
दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं नसतानाही चंद्रशेखर बावनकुळेंनी सबुरीनं, संयमानं काम केलं. मनावर दगड ठेऊन बावनकुळे दोन वर्षे काम करत राहिले. त्याचा फायदा त्यांना झाला, असं पाटील म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक महाविकास आघाडीनं गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन दाखवावी. मग अध्यक्ष कोणत्या पक्षाचा होतो आणि सरकारच्या पाठिशी किती आमदार आहेत ते सरकारला कळेल, असं थेट आव्हान त्यांनी दिलं.