मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा
By Admin | Updated: July 2, 2014 00:52 IST2014-07-02T00:52:17+5:302014-07-02T00:52:17+5:30
मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी घडली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची

मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा
ढाणकी (जि.यवतमाळ) : मध्यान्ह भोजनातून ९० विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुरली येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी घडली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी १ जुलैला नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्यात आले. काही वेळातच डोकेदुखी, उलट्या आदींचा त्रास होऊ लागला. तब्बल ९० विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याने त्यांना ढाणकीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यापैकी तीन विद्यार्थ्यांना उमरखेड येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले. ढाणकी आणि उमरखेड येथे दाखल असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ.कोपटवार यांनी दिली. मुरलीच्या शाळेत २१० विद्यार्थी असून मंगळवारी १९५ विद्यार्थी उपस्थित होते. भोजनात देण्यात आलेली मटकी भिजत ठेवली असता त्यात पालसदृश प्राणी पडून विषबाधा झाल्याचे काही पालक सांगत होते. दरम्यान ढाणकी आरोग्य केंद्रात गटशिक्षणाधिकारी एन.आर. वड्डे, शालेय शिक्षण पोषण आहाराचे अधीक्षक डॉ. प्रमोद सोनटक्के यांच्यासह केंद्रप्रमुख आणि शिक्षक तळ ठोकून आहेत. दोषींवर कारवाई करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी एन.आर. वड्डे यांनी सांगितले. (वार्ताहर)