रामराजे निंबाळकर व राहुल नार्वेकर १५ नोव्हेंबरला नागपुरात; हिवाळी अधिवेशन तयारीचा आढावा घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 20:41 IST2022-11-04T20:38:34+5:302022-11-04T20:41:33+5:30
Nagpur News राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नागपुरात येत आहेत.

रामराजे निंबाळकर व राहुल नार्वेकर १५ नोव्हेंबरला नागपुरात; हिवाळी अधिवेशन तयारीचा आढावा घेणार
नागपूर : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून नागपुरात होत आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी येत्या १५ नोव्हेंबर रोजी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे नागपुरात येत आहेत.
कोरोनामुळे सलग दोन वर्ष नागपुरात अधिवेशनच झाले नाही. यावर्षी सध्या तरी दोन आठवड्यांचे अधिवेशन होणार असले तरी ते कामकाज तीन आठवडे चालविण्यासाठी सत्ताधारी आग्रही आहे. तशा सूचना सरकारतर्फे अधिकाऱ्यांना करण्यात आल्यात. अधिवेशनासाठी रविभवन, नागभवन, आमदार निवास इतर शासकीय इमारतींची देखभाल दुरुस्तीसोबत रंगरंगोटी करण्यात येणार आहे.
यावर्षी अधिवेशनावर होणाऱ्या खर्चात वाढ अपेक्षित असून प्रशासनाने ९५ कोटींच्या खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या असून लवकरच कार्यादेश देण्यात येणार असल्याचे समजते. नवीन शिंदे- फडणवीस सरकारचे खऱ्या अर्थाने हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. त्यामुळे सरकारकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. अधिवेशनाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यासह इतर अधिकारी १५ नोव्हेंबरला येणार आहे.
यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यासह बांधकाम, वीज व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.