नवनियुक्त नागपूर शिवसेना शहराध्यक्षाची ऑडिओ क्लिप व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 00:10 IST2020-10-31T00:08:11+5:302020-10-31T00:10:19+5:30
Shiv Sena city president's audio clip viral, Nagpur news शिवसेनेचे नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन तिवारी यांची आर्थिक देवाणघेवाणीसंबंधाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तिवारी यांनी मात्र ही क्लिप फेब्रिकेटेड असल्याचे म्हटले आहे.

नवनियुक्त नागपूर शिवसेना शहराध्यक्षाची ऑडिओ क्लिप व्हायरल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिवसेनेचे नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन तिवारी यांची आर्थिक देवाणघेवाणीसंबंधाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. तिवारी यांनी मात्र ही क्लिप फेब्रिकेटेड असल्याचे म्हटले आहे.
शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमधील वाद तसा जुनाच आहे. एकाच पक्षात राहून परस्परविरोधी राजकारण करून कुरघोडी करण्याचे प्रयत्न काही मंडळींकडून सातत्याने सुरू असतात. या पार्श्वभूमीवर, दोन दिवसांपूर्वीच नागपुरातील शिवसेनेची नवी टीम जाहीर करण्यात आली. कधीकाळी माजी जिल्हाप्रमुखांचे खास असलेले आणि काही दिवसांपासून अनेकांचे टार्गेट असलेल्या नितीन तिवारी यांना शहर प्रमुख घोषित करण्यात आले. तर अनेकांचा पत्ता कट करण्यात आला. परिणामी सेनेत चांगलीच दुफळी माजली आहे. तिवारी आपल्या पदनियुक्तीचा आनंद घेत असतानाच शुक्रवारी सकाळपासून त्यांचा आवाज वाटणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात त्यांनी सुपारीवाल्याकडून दोन लाख रुपये मिळाल्याचे सांगून किती लोकांना बटवारा झाला, त्यांची नावे सांगितली आहेत. पलीकडून बोलणारा व्यक्ती विश्वासघात झाल्याचे सांगून नाराजी व्यक्त करीत आहेत. या क्लिपने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
कायदेशीर कारवाई करणार - तिवारी
या क्लिपच्या संबंधाने नितीन तिवारी यांच्याशी संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेतली असता त्यांनी ही ऑडिओ क्लिप जुनी असून फॅब्रिकेटेड, एडिटेड असल्याचे म्हटले आहे.ती कुणाच्या मोबाईलमधून व्हायरल झाली, त्याची चौकशी करावी असेही ते म्हणाले. क्लिपच्या माध्यमातून आपली बदनामी करणाऱ्यांवर आपण कायदेशीर कारवाई करू, असेही तिवारी म्हणाले.