नवीन तुरी बाजारात, भाव सहा हजारापर्यंत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:08 IST2021-01-02T04:08:06+5:302021-01-02T04:08:06+5:30
नागपूर : कळमना बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, सोमवारी पहिल्याच दिवशी तूरीला ५,५०० ते ६ हजार रुपयापर्यंत ...

नवीन तुरी बाजारात, भाव सहा हजारापर्यंत!
नागपूर : कळमना बाजारात नवीन तुरीची आवक सुरू झाली असून, सोमवारी पहिल्याच दिवशी तूरीला ५,५०० ते ६ हजार रुपयापर्यंत भाव मिळाला. नव्या सीझनमध्ये प्रारंभी १२५ ते १५० पोत्यांची आवक झाली असली तरीही जानेवारी महिन्यात आवक वाढण्याची शक्यता अडतियांनी व्यक्त केली.
नवीन तूर आल्याने डाळीच्या भावात काही प्रमाणात निश्चितच घसरण होणार आहे. सध्या बाजारात तूर डाळीचे दर दर्जानुसार ९० ते १०० रुपये आहेत. मध्यंतरी यंदा तुरीचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आल्यानंतर, तूर डाळीचे दर १३० रुपयापर्यंत पोहोचले होते. त्यानंतर केंद्र सरकारने आयात शुल्क कमी केले आणि व्यापाऱ्यांना आयातीचा परवाना जारी केल्यानंतर डाळीचे दर कमी झाले. यंदा तुरीचे उत्पादन मुबलक असल्याच्या अंदाजाने पुढे डाळीचे दर कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
अडतिये कमलाकर घाटोळे म्हणाले, सध्या सोयाबीनची आवक फारच कमी आहे, शिवाय धानाची आवकही कमी झाली आहे. गेल्या १५ ते २० दिवसापूर्वी धानाची आवक दररोज जवळपास १० हजार पोती होती. आता घसरण होऊन ५ हजार पोत्यांवर आली आहे. सध्या धानाला २ हजार ते २,३५० रुपये भाव आहे. सर्वच बाजारपेठांमध्ये तांदूळ मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पुढे धानाची आवक कमी होण्याची शक्यता आहे. तसे पाहता यावर्षी धानाचे पीक कमी होते.