पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली : नागपूर विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:44 IST2018-04-05T00:43:50+5:302018-04-05T00:44:10+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समारंभात त्यांच्याच नावावर असलेले पदक गुणवंत विद्यार्थिनीला देण्यात आले. ही बाब विद्यापीठातील अधिकाऱ्यांना खटकली असून कुठलाही आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या नावावरील पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली : नागपूर विद्यापीठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांना नामवंत व्यक्तींच्या नावे पदके व पारितोषिके देण्यात येतात. दानदात्यांकडून यासाठी निधी देण्यात येतो. परंतु डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांची पदविका रद्द केल्यानंतर १०५ व्या दीक्षांत समारंभात त्यांच्याच नावावर असलेले पदक गुणवंत विद्यार्थिनीला देण्यात आले. ही बाब विद्यापीठातील अधिकाऱ्यांना खटकली असून कुठलाही आरोप सिद्ध झालेल्या व्यक्तीच्या नावावरील पदक रद्द करण्यासंदर्भात नवीन नियमावली तयार करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाङ्मय चौर्यप्रकरणात दोषी ठरलेल्या डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्याकडून गांधी विचारधारेची पदविका विद्यापीठाने काढून घेतली. तसेच विद्यापीठाच्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून त्यांचे नावही लगेच काढण्यात आले. मात्र, त्यांच्या नावावर देण्यात येणारे दीक्षांत समारंभातील सुवर्णपदक अद्यापही कायम आहे. विद्यापीठाच्या १०५ व्या दीक्षांत समारंभात हे पदक एमएडच्या विद्यार्थिनीला प्रदान करण्यात आले. यानंतर हे पदक रद्द करण्यात येईल का अशी विद्यापीठ वर्तुळात चर्चादेखील रंगली होती. परंतु नियमानुसार असे करणे शक्य नाही. नियमांत पदक रद्द करण्याची तरतूदच नाही. त्यासाठी विद्यापीठाला नियमांमध्ये बदल करावा लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
यासंदर्भात कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा केली असता त्यांनी आतापर्यंत तर पदक रद्द करण्याची कधीही वेळ आली नसल्याचे स्पष्ट केले. परंतु एखादे पदक रद्द करण्याचे अधिकार विद्यापीठाकडे असायला हवेत. एखादी व्यक्ती दोषी आढळली असेल तर त्या व्यक्तीच्या नावाने पदक देणे योग्य राहणार नाही. पदक रद्द करण्यासंदर्भात नियमांत बदल आवश्यक आहे. त्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.